रत्नागिरी : भरणेतील खूनप्रकरणी पोलिस कर्मचाऱ्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2018 02:23 PM2018-11-09T14:23:05+5:302018-11-09T14:23:58+5:30
भरणे येथील अण्णाच्या पऱ्यानजीक संशयास्पदरीत्या आढळलेल्या रुग्णवाहिका चालकाचा खून झाल्याचे स्पष्ट झाले असून याप्रकरणी ठाणे ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
खेड : भरणे येथील अण्णाच्या पऱ्यानजीक संशयास्पदरीत्या आढळलेल्या रुग्णवाहिका चालकाचा खून झाल्याचे स्पष्ट झाले असून याप्रकरणी ठाणे ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
अनंत पांडुरंग गोरे (३६, मुळगाव-चाटव, सध्या सुमन अपार्टमेंट, भडगाव-खोंडे) असे या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून तो ठाणे ग्रामीण पोलिस ठाण्यात सेवेत होता. मात्र तो आणि मयत संकेत शशिकांत खोपकर (२६) यांची कुटुंबे एकाच अपार्टमेंटमध्ये राहतात.
मयत संकेत याचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय पोलिस कर्मचारी असलेल्या अनंत गोरे याला होता. त्या संशयातून संकेत शशिकांत खोपकर (२६) याचा खून केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. दरम्यान गोरे याला खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर केले असता ९ नोव्हेंबरपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
३ नोव्हेंबर रोजी संकेत खोपकर याचा भरणेतील अण्णाच्या पºयानजीक मृतदेह आढळला होता. याचठिकाणी त्याची दुचाकी सापडली होती. घटना उघडकीस आल्यानंतर खेड पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून संशयितास अटक केली. मंगेश खोपकर यांनी याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त करत संशयिताचे नाव दिले होते. त्यानंतर पोलिसांनी एका संशयित म्हणून ताब्यात घेतले होते. जोपर्यंत संशयितास अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका संकेतच्या कुटुंबीयांनी घेतली होती.
याशिवाय तालुक्यातील रोहिदास समाज बांधवांनी मारेकऱ्यास अटक करण्याची मागणी केली होती. जमावाला सामोऱ्या गेलेल्या उपविभागीय पोलिस अधिकारी विश्वेश्वर नांदेडकर यांनी संशयितावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेतला होता. या प्रकरणी अधिक तपास खेड पोलीस करीत आहेत.