रत्नागिरीचे पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे यांना महासंचालक पदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 03:59 PM2018-07-09T15:59:06+5:302018-07-09T16:02:23+5:30
पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झाले याबद्दल पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांच्या हस्ते रत्नागिरीचे उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे यांचा सत्कार करण्यात आला.
रत्नागिरी : नक्षलवादी भाग अशी ओळख असणाऱ्या गडचिरोली येथे उपविभागीय अधिकारी म्हणून दोन वर्षे कार्यरत असलेले रत्नागिरीचे उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे यांच्या पहिल्याच उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्यांना पोलीस खात्यातील मानाचे पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
इंगळे यांना सन २०१५मध्ये गडचिरोली येथे पहिलीच उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली. येथील पोलीस विभागाला सदैव सतर्क राहावे लागते. याचबरोबर त्यांनी आदिवासी भागातील युवावर्गासाठी केलेल्या विशेष कार्याची दखलही या सन्मानासाठी घेण्यात आली आहे.
१ ते १२ जानेवारी असे तब्बल १२ दिवस त्यांनी आदिवासी मुलांकरिता पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन उपक्रम राबविला. तसेच कारवाफासारख्या ग्रामीण भागात त्यांनी युवा महोत्सव आयोजित केला.
सावित्रीबाई फुले स्मृतिदिनी महिला अधिकारी, पदाधिकाऱ्यांचे सत्कार, पत्रकार सन्मान असे विशेष कार्यक्रम केले. त्याचबरोबर या विभागांमधील चतुर्थ ते अगदी उच्च पदापर्यंतची नोकरी याविषयी मार्गदर्शन उपलब्ध करून दिले.
या कालावधीत सांस्कृतिक, शारीरिकबरोबरच कौन बनेगा हजारोपती, यासारखी आगळीवेगळी बौद्धिक स्पर्धाही आयोजित केली होती. ज्ञानगंगा या नावाने फिरते वाचनालय सुरू करून त्यासाठी दीड हजार पुस्तके गोळा केली. जनजागरण, जनमैत्री मेळावे, जनविकास मेळावे आदींच्या माध्यमातून जनप्रबोधन करत युवा पिढीमध्ये चैतन्य निर्माण केले.
त्यांनी सामाजिक बांधिलकीतून आदिवासींकरिता केलेले कार्य तसेच नक्षलवाद्यांच्या विरोधात उघडलेली मोहीम, अशा त्यांच्या या सर्वंकष कार्याची दखल घेऊन त्यांना हे मानाचे पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. थोड्याच दिवसांत त्यांना ते प्रदान करण्यात येणार आहे.
तिघांचे आत्मसमर्पण
नियुक्ती स्वीकारल्यानंतर गणेश इंगळे यांना काही कालावधीतच नक्षलवादी विरोधी दोन मोहिमांना सामोरे जावे लागले. या भागातील पाच जहाल नक्षलवाद्यांना अटक करण्यात त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. तसेच ३ जणांनी आत्मसमर्पण केले. ठासनीच्या ४८ बंदुका जप्त केल्या.