रत्नागिरी : गुहागरात शिवसेना, राष्ट्रवादीच्या जाहीर सभांची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 07:35 PM2018-04-03T19:35:13+5:302018-04-03T19:35:13+5:30
गुहागर नगरपंचायत निवडणुकीसाठी सर्वच पक्षांचा प्रचाराचा वेग आता वाढला आहे. शहर विकास आघाडीकडून अंतिम टप्प्यात उद्योगमंत्री अनंत गीते व राष्ट्रवादीकडून आमदार भास्कर जाधव यांच्या जाहीर सभा होणार आहेत. या सभांमधून राजकीय शर्यतीत वरचढ कोण? याबाबत शहरात चर्चा रंगू लागल्या आहेत.
संकेत गोयथळे
गुहागर : गुहागर नगरपंचायत निवडणुकीसाठी सर्वच पक्षांचा प्रचाराचा वेग आता वाढला आहे. शहर विकास आघाडीकडून अंतिम टप्प्यात उद्योगमंत्री अनंत गीते व राष्ट्रवादीकडून आमदार भास्कर जाधव यांच्या जाहीर सभा होणार आहेत. या सभांमधून राजकीय शर्यतीत वरचढ कोण? याबाबत गुहागर शहरात चर्चा रंगू लागल्या आहेत.
भास्कर जाधव व अनंत गीते यांच्यामध्ये गेली अनेक वर्षे आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी येथील जनतेने ऐकल्या आहेत. भास्कर जाधव यांच्याकडून सर्वाधिक टीका अनंत गीतेंवर केली जाते. अनंत गीते यांच्यावर गेली अनेक वर्षे कुणबी समाजाने मतदारातून प्रेम व्यक्त केले आहे.
भास्कर जाधव यांच्याबरोबरची राजकीय शत्रूता व कुणबी समाजाची व्होटबँक टिकवण्यासाठी काही महिन्यांपूर्वीच जाहीर सभेतून अप्रत्यक्षरित्या कुणबी समाजाने स्थापन केलेल्या शहर विकास आघाडीला पाठिंबा दिला होता.
आघाडीमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनाही सामील व्हायचे आदेश दिले. उमेदवारी अर्ज भरताना येणाऱ्या अडचणीही दूर करत आघाडी सक्षम ठेवण्याचा प्रयत्न केला. आघाडीच्यावतीने नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेश बेंडल आघाडीची ध्येयधोरणे प्रचारसभातून मांडत आहेत.
आघाडी होण्यासाठी एकमेव अनंत गीते या मोठ्या नेत्याचे नाव पडद्याआडून सक्रीय होते. भाजप, राष्ट्रवादी या मोठ्या पक्षांना टक्कर द्यायची असेल तर आपल्या पाठीशी असणारा एकमेव मोठा नेता म्हणजे उद्योगमंत्री अनंत गीते यांचं भाषण झाल्यास कुणबी समाज बांधवांना व शिवसैनिकांना स्फूरण येईल, या उद्देशाने ३ एप्रिलला रंगमंदिर येथे सायंकाळी जाहीर सभेचे आयोजन केले आहे.
आमदार भास्कर जाधव हे वॉर्डातून फिरत आहेत. ठराविक ठिकाणी सभा घेऊन मतदारांना आवाहन करत आहेत. नगरपंचायतीच्या माध्यमातून प्रत्येक वॉर्डातून झालेली कोट्यवधीची कामे याच प्रमुख मुद्द्यावर राष्ट्रवादीचा प्रचार सुरु आहे.
खालचापाट येथील सभेत डॉ. विनय नातूंवर जोरदार टीका केली. हे चार वर्षे सत्तेत असूनही नातूंना येथील विकासकामे करता आली नाहीत, अशी बोचरी टीका केली. निवडणूक लागल्यावर विनय नातू घराघरात फिरत वॉर्डात अपेक्षित कामांची यादी करताना येथील जनतेने आता शहरात एरवी विकासकामे झाली आहेत की, आता कोणती कामे शिल्लकच राहिली नाहीत, अशा शब्दात उत्तर दिल्याने नातू जाहीरपणे जनतेसमोर प्रचार करणारच नाहीत, असा दावा केला.
भाजपची आघाडीसोबतची चर्चा व उमेदवार निवडीवेळी भाजपचे रवींद्र चव्हाण यांनी गुहागरमध्ये हजेरी लावली होती. आता राष्ट्रीय पक्ष असणाऱ्या भाजपकडून अंतिम टप्प्यात कोणी मोठा नेता येणार की जाहीर सभा होणारच नाही, याबाबत स्पष्ट असे काही संकेत नाहीत.
कोण काय बोलणार?
भास्कर जाधव यांचीही ४ एप्रिलला रंगमंदिर येथे जाहीर सभा होणार आहे. उद्योगमंत्री अनंत गीते यांची या सभेपूर्वी सभा असल्याने गीते काय बोलतात, यावर जाधव यांची रणनीती ठरेल. गीतेंनी अनेकवेळा खासदार दोन वेळा कॅबिनेटमंत्री होऊन येथील जनतेसाठी काय केले हा प्रश्न जाधव यांनी अनेक सभातून विचारला आहे.
यावेळी नगरपंचायतीमध्ये गीते यांनी आघाडीला पुढे करुन लक्ष घातल्याने आमदार भास्कर जाधव किती आक्रमक होऊन या सर्व घडामोडींचा समाचार कशा प्रकारे घेतात, हा चर्चेचा विषय आहे.