रत्नागिरी : मद्यवाहतुकीवर उत्पादन शुल्कची नजर, जिल्ह्यात नववर्ष स्वागताची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 03:46 PM2017-12-28T15:46:27+5:302017-12-28T15:50:54+5:30
मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षाचे जल्लोषी स्वागत करण्यासाठी जिल्हावासीय सज्ज झाले आहेत. दुसरीकडे जिल्ह्यात बेकायदा दारूची वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी विभागातर्फे महामार्गावर तपासणी मोहीम कडक करण्यात आली आहे. महामार्गावर दोन तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. बेकायदा मद्याचा महापूर रोखण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथक वाहनांची तपासणी करीत आहे.
रत्नागिरी : मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षाचे जल्लोषी स्वागत करण्यासाठी जिल्हावासीय सज्ज झाले आहेत. दुसरीकडे जिल्ह्यात बेकायदा दारूची वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी विभागातर्फे महामार्गावर तपासणी मोहीम कडक करण्यात आली आहे. महामार्गावर दोन तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. बेकायदा मद्याचा महापूर रोखण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथक वाहनांची तपासणी करीत आहे.
गेल्या काही वर्षांपासून गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची बेकायदा वाहतूक मुंबई-गोवा महामार्गावरून केली जात आहे. चोरी-छुपे हे गोवा बनावटीचे विदेशी मद्य महामार्गावरून विविध क्लुप्त्या लढवून नेले जात आहे. गेल्या दोन वर्षांच्या काळात महामार्गावरून चोरट्या पध्दतीने वाहतूक होत असलेले विदेशी मद्य तसेच स्पिरीट उत्पादन शुल्क विभागाने जप्त केले होते. याप्रकरणी अनेकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.
३१ डिसेंबरला अवघे काही दिवस उरलेले असताना गोवा बनावटीच्या मद्याची चोरटी वाहतूक जोरात सुरू झाल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी उत्पादन शुल्क विभाग सतर्क झाला आहे. जिल्ह्यात बेकायदा विदेशी मद्याची वाहतूक होऊ नये, होत असल्यास असे मद्य जप्त करावे, संबंधितांवर कारवाई करावी, यासाठी उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्याच्या सीमेवर दोन ठिकाणी तपासणी नाकी उभारली आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर राजापूर तालुक्यात महामार्गावर एक तपासणी नाके उभारण्यात आले आहे, तर दुसरे तपासणी नाके कुंभार्ली घाटात उभारण्यात आले आहे. उत्पादन शुल्कचे एक जिल्हा भरारी पथकही कार्यरत झाले आहे. रेल्वेच्या रो-रो सेवेमार्फतही काही महिन्यांपूर्वी गोवा बनावटीच्या बेकायदा मद्याची, स्पिरीटची वाहतूक झाल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे रेल्वेदवारे मद्य वाहतूक होणार नाही, याकडेही लक्ष दिले जात आहे.
दारूभट्ट्यांचे आव्हान
महामार्गावरून बेकायदा वाहतूक होणाऱ्या गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक रोखणे, हे उत्पादन शुल्क विभागासमोरील आव्हान आहे, तर दुसरीकडे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गावठी दारूच्या भट्ट्यांमधून निर्माण झालेली दारू पकडण्याचे, भट्ट्या उद्ध्वस्त करण्याचेही आव्हान उत्पादन शुल्क विभागासमोर आहे. गावठी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त करूनही त्या पुन्हा उभारल्या जाणाºया ठिकाणी उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर आहे.
परमीट रुमचीही झडती
जिल्ह्यातील परमीट रूमवरही उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर आहे. थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बारमध्ये गोवा बनावटीचे बेकायदा मद्य तर नाहीना, याचीही तपासणी विभागाच्या पथकामार्फत केली जात आहे. बेकायदा मद्यसाठा अन्यत्र कोठे करण्यात आला आहे काय, याचीही माहिती विभागामार्फत घेतली जात आहे. लांजा विभागात परमीट रूमच्या झालेल्या झाडाझडतीमध्ये अद्याप तरी काही गैर आढळून आलेले नाही.