रत्नागिरी : लोकमान्य टिळक स्मारकचे संग्रहालय प्रगतीपथावर, चिपळुणात काम वेगाने सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 06:00 PM2018-05-26T18:00:50+5:302018-05-26T18:00:50+5:30
लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वस्तू संग्रहालयाचे काम वेगाने सुरु असून, पुढील दोन महिन्यात हे संग्रहालय अभ्यासक व रसिकांसाठी खुले होणार आहे.
चिपळूण : लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वस्तू संग्रहालयाचे काम वेगाने सुरु असून, पुढील दोन महिन्यात हे संग्रहालय अभ्यासक व रसिकांसाठी खुले होणार आहे.
या संग्रहालयात अनेक दुर्मीळ वस्तू पाहायला मिळणार आहेत. यामध्ये दोन लाख वर्षांपूर्वीची अश्मयुगीन हत्यारे, हडप्पा इथल्या उत्खननात मिळालेल्या वस्तू, इनामगाव, तेर आदी ठिकाणाच्या संशोधनात मिळालेल्या दुर्मीळ वस्तू, दोन हजार वर्षांपूर्वीची नाणी, जुन्या मूर्ती, कागदपत्रे अशा असंख्य वस्तूंचा यामध्ये समावेश आहे.
या वस्तू संग्रहालयामुळे अनेकांना जुन्या दुर्मीळ वस्तू पाहता येणार आहेत. त्याचबरोबर त्यांचा अभ्यासही करता येणार आहे. त्यामुळे हे संग्रहालय सर्वांना पर्वणीच ठरणार आहे.
या संग्रहालयासाठी दाभोळ येथील ज्येष्ठ नागरिक राजाभाऊ जोशी यांनी त्यांच्या घरातील अनेक जुन्या वस्तू दिल्या आहेत. चिनी मातीचे गेल्या शतकातील रांजण, दगडी भांडी, लग्नात कऱ्हा दिवा घेतात ती समई अशा अनेक वस्तू व त्याचबरोबर जुने ग्रंथ, विविध कोश वाचनालयासाठी दिली आहे.
दाभोळ येथे अण्णा शिरगावकर यांच्या प्रयत्नातून या वस्तू व ग्रंथ संग्रहालयाला उपलब्ध झाले आहेत. वाचनालयाचे अध्यक्ष अरुण इंगवले व संचालक मधुसूदन केतकर यांनी या बहुमोल वस्तूंमुळे वाचनालयाचे हे संग्रहालय समृध्द होणार असल्याचे सांगून जोशी यांचे आभार मानले आहेत.