Ratnagiri: ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक नोटीस
By मनोज मुळ्ये | Published: April 26, 2023 11:34 AM2023-04-26T11:34:47+5:302023-04-26T11:35:03+5:30
Ratnagiri: ग्रामस्थांनी मंगळवारी केलेल्या आंदोलनानंतर शांत झालेल्या बारसू परिसरात राजकीय लोकांच्या दौऱ्यामुळे तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते, याची दखल घेत रत्नागिरी शहर पोलिसांनी ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.
- मनोज मुळ्ये
रत्नागिरी : ग्रामस्थांनी मंगळवारी केलेल्या आंदोलनानंतर शांत झालेल्या बारसू परिसरात राजकीय लोकांच्या दौऱ्यामुळे तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते, याची दखल घेत रत्नागिरी शहर पोलिसांनी ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी बारसू परिसरात सुरू असलेल्या भू सर्वेक्षण क्षेत्रात प्रवेश न करण्याची नोटीस रत्नागिरी शहर पोलिसांनी ठाकरे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, विधानसभा क्षेत्रप्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख यांना दिली आहे.
बुधवारी (२६ एप्रिल) खासदार विनायक राऊत रत्नागिरीत दाखल झाले आहेत. ते बारसू परिसरात जाण्याची शक्यता आहे. त्यांच्यासोबत असलेले ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विलास चाळके, रत्नागिरीचे तालुकाप्रमुख प्रदीप तथा बंड्या साळवी, प्रमोद शेरे यांना ही नोटीस देण्यात आली.
मंगळवारी सकाळच्या सत्रात ग्रामस्थांनी आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर बारसूमधील वातावरण निवळले आणि भू सर्वेक्षणाचे काम तातडीने सुरू करण्यात आले. बुधवारी ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी बारसू येथे जाण्याच्या तयारीत असल्याची कुणकुण पोलिसांना लागली. त्यामुळे बारसू येथील निवळलेले वातावरण ढवळण्याची शक्यता असल्याने या पदाधिकाऱ्यांना भू सर्वेक्षण सुरू असलेल्या क्षेत्रात प्रवेश न करण्याचे प्रतिबंधात्मक आदेश देण्यात आले आहेत.