रत्नागिरी : पु. लं.चा दानयज्ञ जगभर पोहोचणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 03:29 PM2018-11-13T15:29:19+5:302018-11-13T15:33:16+5:30
पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पुल व सुनीताबाई यांनी सुरू केलेल्या दान यज्ञाला जगभरात पोहोचविण्यासाठी येथील आर्ट सर्कल संस्थेने पाऊल उचलले आहे. सोशल मीडियावर #पुलसुनीत फेसबुक पेज तयार केले आहे.
रत्नागिरी : पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पुल व सुनीताबाई यांनी सुरू केलेल्या दान यज्ञाला जगभरात पोहोचविण्यासाठी येथील आर्ट सर्कल संस्थेने पाऊल उचलले आहे. सोशल मीडियावर #पुलसुनीत फेसबुक पेज तयार केले आहे.
पु. ल.प्रेमींनी जगाच्या पाठीवर कुठेही असताना तेथील गरजू संस्थेला पुल आणि सुनीताबाई यांच्या नावाने मदत करावी व फेसबुक पेजवर कळविण्याचे आवाहन संस्थेने केले आहे. आर्ट सर्कलतर्फे नितीन कानविंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना फेसबुक पेजबाबत माहिती दिली.
एखादी संकल्पना जगभरात पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा उत्तम वापर करता येतो, हे आता सिध्द झाले आहे. यासाठी सोशल मीडियावर (#) हॅशटॅग चळवळ पुलंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त चालवण्याचे ठरविले आहे. गेली दहा वर्षे रत्नागिरीमध्ये पुलोत्सवच्या माध्यमातून संस्थेतर्फे सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देण्यात येत आहे. पुल आणि सुनीताबाई यांनी शेकडो संस्थांना उभे राहण्यासाठी मदत केली. त्यामध्ये मुक्तांगण, आयुकासारख्या संस्थाचा समावेश आहे.
हे दानयज्ञ चालवताना दोघांनीही त्याबाबत वाच्यता केलेली नव्हती. मात्र, पुल साहित्यिक, लेखक, अभिनेते, संगीतकार, कथाकार होते तसेच ते दानशूर होते. याची माहिती जगभर पोहोचावी आणि त्याच प्रेरणेतून जगभरातील गरजू संस्थांपर्यंत मदतीचे हात पोहोचविण्याच्या उद्देशातून फेसबुक पेज सुरू केले आहे. या सोशल मीडियावरील चळवळीसाठी आतापर्यंत जे सेलिब्रिटी पुलोत्सवच्या माध्यमातून रत्नागिरीत येऊन गेले त्यांनाही यामध्ये सहभागी करून घेणार आहे.