रत्नागिरी रेल्वे स्थानक बनणार ‘गलिच्छ’

By admin | Published: March 2, 2015 10:08 PM2015-03-02T22:08:47+5:302015-03-03T00:32:18+5:30

कोकण रेल्वे : ब्लास्टलेस ट्रॅक उखडण्याचा हट्ट कोणाचा?

Ratnagiri railway station to become 'dirty' | रत्नागिरी रेल्वे स्थानक बनणार ‘गलिच्छ’

रत्नागिरी रेल्वे स्थानक बनणार ‘गलिच्छ’

Next

रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनलगतचा ट्रॅक अखेर ब्लास्ट ट्रॅक उभारण्यासाठी उखडण्यात आला आहे. रुळ आणि स्लीपर्स हटविण्याचे काम सुरू झाले आहे. येथील तीनही प्लॅटफॉर्मलगतचे ट्रॅक ‘ब्लास्टलेस’ (सिमेंट बेस ट्रॅक) उभारण्याऐवजी ब्लास्ट ट्रॅक (खडीयुक्त) बनवण्याचा हट्ट कोकण रेल्वे व्यवस्थापनाने धरला आहे. ब्लास्ट ट्रॅकवर रेल्वेच्या प्रसाधनगृहातून पडणाऱ्या घाणीची सफाई करता येत नसल्याने स्थानकावर घाणीचे साम्राज्य निर्माण होणार आहे. तसेच प्रवासी व स्थानकावर काम करणाऱ्या कर्मचारी, विक्रेत्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी हे महत्त्वाचे स्थानक असून, येथे सर्वच रेल्वे गाड्या थांबवल्या जातात. त्यामुळे प्लॅटफॉर्मवर रेल्वेच्या प्रसाधनगृहातील घाण ट्रॅकवर पडते. ब्लास्टलेस ट्रॅक हा सिमेंटच्या कट्ट्याप्रमाणे बनवला जातो. अशा कट्ट्याची पाण्याच्या वापराने स्वच्छता करणे शक्य आहे. मात्र, ब्लास्ट ट्रॅकला स्लीपर्स व ट्रॅकखाली खडी टाकली जाते. अशा ट्रॅकवरील घाण ही साफ करणे अशक्य असते. त्यामुळे घाण साचत जाऊन ट्रॅकवर घाणीचे साम्राज्य निर्माण होते. मुळातच कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरीत तीन व मडगाव रेल्वेस्थानकावर एक असे चारच ब्लास्टलेस अ‍ॅप्रन आहेत. भारतीय रेल्वेच्या विविध स्थानकांवर ८ हजारपेक्षाही अधिक ब्लास्टलेस अ‍ॅप्रन आहेत व त्यांची स्वच्छता केली जाते. असे असताना केवळ चार ब्लास्टलेस ट्रॅक कोकण रेल्वेला टिकविता येत नाही, हे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रीया प्रवाशांतून व्यक्त होत आहे.
शनिवारपासून रत्नागिरी रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म नंबर २ लगतच्या ब्लास्टलेस अ‍ॅप्रनवरील रूळ उखडण्याचे काम जेसीबीद्वारे सुरू आहे. सिमेंट स्लीपर्स काढून प्लॅटफॉर्मवर ठेवण्यात आले आहेत. स्थानकांवरील सिमेंट बेस रेल्वेमार्गाची स्वच्छता राखणे शक्य होत असल्याने तीन महिन्यांपूर्वीच त्याचे कामही एका ठेकेदाराला देण्यात आले होते. परंतु ते काम अर्धवट टाकून संबंधित ठेकेदार गायब झाला. आधीच्या कामावर लाखो रुपये खर्च केल्यानंतर आता ब्लास्ट ट्रॅकच्या कामावर पुन्हा लाखो रुपये खर्च होणार आहते. सिमेंटबेस ट्रॅकला देखभाल खर्च कमी असून क्षमताही अधिक असते. मात्र, खडीयुक्त ट्रॅकला सातत्याने देखभालही करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)

मुंबईसाठी ३ नंबर प्लॅटफॉर्म...
शनिवार (२८ फेब्रुवारी २०१५) पासूनच प्लॅटफॉर्म नंबर दोन मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांसाठी बंद करण्यात आला. या प्लॅटफॉर्मवरील गाड्या तीन नंबर प्लॅटफॉर्मवर वळविण्यात आल्या आहेत. २ नंबर प्लॅटफॉर्मलगतच्या ट्रॅक ब्लास्ट अ‍ॅप्रनचे काम २० दिवसांत पूर्ण करण्याची मुदत आहे. मात्र, हे काम २० दिवसात होणे कठीण असल्याचे सांगितले जात आहे. मुळातच हा ब्लास्ट ट्रॅक करण्याची आवश्यकता नव्हती, तर स्वच्छतेच्या दृष्टीने ब्लास्टलेस ट्रॅक होणे आवश्यक आहे. आजही प्रवाशांची ही मागणी आहे. त्यामुळे रत्नागिरी स्थानक घाणीच्या साम्राज्यात बुडविण्याची कोकण रेल्वे व्यवस्थापनाला घाई झाली आहे काय, असा संतप्त सवालही केला जात आहे.



सिमेंट बेस ट्रॅकचे काम कमी खर्चात होते, तसेच स्वच्छता राखण्यासाठी उपयुक्त असताना खडीयुक्त मार्ग बनविण्याचा घाट नेमका कोणी घातला, याचीच चर्चा आता सुरू झाली आहे. याप्रकरणी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी लक्ष घालून मार्ग काढण्याची मागणी होत आहे.


ब्लास्टलेसऐवजी खडीयुक्त ट्रॅक बसवण्याची मागणी.
स्वच्छ रत्नागिरी स्थानकाची जबाबदारी कोणाची, याबाबत विचारणा.
अस्वच्छतेचे दर्शन संतापकारी, रेल्वेच्या कारभारात सुधारणा कधी होणार.

Web Title: Ratnagiri railway station to become 'dirty'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.