Chiplun Flood: आधीच घरात पुराचं पाणी, त्यात मगरींचं संकट; चिपळूणच्या रहिवासी भागात मगरींचा संचार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 01:03 PM2021-07-23T13:03:38+5:302021-07-23T13:07:45+5:30
Chiplun Flood: पुराच्या पाण्यानं वेढलेल्या चिपळूण वासियांसमोर अस्मानी संकट कोसळेलं असताना आता नव्या संकटाला सामोरं जावं लागत आहे.
Chiplun Flood: पुराच्या पाण्यानं वेढलेल्या चिपळूण वासियांसमोर अस्मानी संकट कोसळेलं असताना आता नव्या संकटाला सामोरं जावं लागत आहे. वशिष्ठी नदीला पूर आल्यानं नदीतील मगरी आता रहिवासी परिसरात शिरल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आधीच पुराच्या पाण्यानं वेढलेल्या रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
चिपळूणमधील खर्डी या गावात पुराच्या साचलेल्या पाण्यात संचार करणाऱ्या मगरीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. खर्डी परिसर तसा दाटीवाटीचा परिसर आहे. खर्डी परिसराला देखील पुराचा मोठा फटका बसला आहे. आज येथील पुराचं पाणी काही प्रमाणात ओसरत आहे. यात मोठ्या प्रमाणात चिखल आणि गाळ रस्त्यांवर, दुकानांत, घरांत शिरला आहे. त्यात काही भागांत अजूनही पाणी ओसरलेलं नाही. अशात मगरींचा वावर पुराच्या पाण्यातून दिसून आल्यानं रहिवासी भागांमध्ये मगरींचा शिरकाव झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
VIDEO: चिपळूणमधील खर्डी येथे पुराच्या पाण्यात मगरींचा मुक्त संचार, रहिवाशांमध्ये घबराट#Chiplun#ChiplunFloodpic.twitter.com/5hGwKQ6yKq
— Lokmat (@MiLOKMAT) July 23, 2021
वशिष्ठी नदीत मगरींचा वावर असतो. गेल्या दोन-तीन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे वशिष्ठी आणि जगबुडी नदीला पूर आला आहे. त्यामुळे खेड, चिपळूणला मोठा फटका बसला आहे. वशिष्ठीनं पात्र ओलांडून शहरात प्रवेश केल्यानं पर्यायानं नदीतील मगरी देखील शहरात शिरल्याची शक्यता आहे.