रत्नागिरी : रिफायनरीविरोधात आता विधानसभेतच लढणार : राजन साळवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 05:15 PM2018-11-14T17:15:26+5:302018-11-14T17:25:44+5:30
नाणार रिफायनरी प्रकल्पापासून ते अयोध्येतील राममंदिर निर्माण प्रकरणी शिवसेनेने सातत्याने स्पष्ट भूमिका घेतलेली असताना त्याकडे साफ दुर्लक्ष करीत उठ-सूठ शिवसेनेवरच नाहक टिका करणाऱ्या अशोक वालम यांना कोणतीच राजकीय पार्श्वभूमी नसल्याने अस्तित्वासाठी त्यांची केविलवाणी धडपड सुरु असून आमच्यावर बोलण्यापेक्षा त्यांनी स्वत:चे पहावे, असा जोरदार पलटवार आमदार राजन साळवी यांनी राजापुरात आयोजीत पत्रकार परिषदेत केला.
राजापूर : नाणार रिफायनरी प्रकल्पापासून ते अयोध्येतील राममंदिर निर्माण प्रकरणी शिवसेनेने सातत्याने स्पष्ट भूमिका घेतलेली असताना त्याकडे साफ दुर्लक्ष करीत उठ-सूठ शिवसेनेवरच नाहक टिका करणाऱ्या अशोक वालम यांना कोणतीच राजकीय पार्श्वभूमी नसल्याने अस्तित्वासाठी त्यांची केविलवाणी धडपड सुरु असून आमच्यावर बोलण्यापेक्षा त्यांनी स्वत:चे पहावे, असा जोरदार पलटवार आमदार राजन साळवी यांनी राजापुरात आयोजीत पत्रकार परिषदेत केला.
दोन दिवसांपूर्वी कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर टिका केली होती. अयोध्येतील राममंदिरप्रकरणी जनतेला हाक देणा?्या उध्दव ठाकरेन्ना नाणार प्रकल्पामुळे आमची भुईसपाट होणारी त्र्येपन्न मंदिरे दिसली नाहीत का असा सवाल उपस्थित करीत ठाकरेंचे रामप्रेम व हिंदुत्व हे बेगडी असल्याचा आरोप केला होता. त्याला आमदार राजन साळवी यांनी सडेतोड उत्तर दिले.
शिवसेनेने राममंदिर प्रश्नापासून रिफायनरी प्रकल्पाबाबत सातत्याने ठोस अशीच भूमिका घेतली असून त्या भूमिकेत कधीच बदल केलेला नसल्याचे आमदार साळवी यांनी निदर्शनास आणून दिले. अयोध्येत रामंदिर व्हावे, ही शिवसेनाप्रमुखांची इच्छ होती. ज्यावेळी बाबरीचे पतन झाले, त्यावेळी देशात उद्भवलेल्या पररिस्थितीमध्ये त्या घटनेची जबाबदारी कुणी घ्यायला तयार नव्हते.
भाजप नेत्यांनी तर शिवसैनिकांनी मशीद पाडल्याचे विधान केले होते. त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी ती जबाबदारी स्विकारताना जर शिवसैनिकांनी मशीद पाडली असेल तर त्याचा आपल्याला अभिमान असल्याचे ठणकावुन सांगितले होते. याची आठवण करुन देताना आमदार साळवी यांनी राममंदिरचा मुद्दा शिवसेनेने सोडलेला नसल्याचे स्पष्ट केले.
राममंदिरच्या मुद्द्यावरुन केंद्र्रात सत्ता मिळवणाऱ्या भाजपाने मागील साडेचार वर्षात न्यायालयाचा आधार घेताना मंदिर निर्माणप्रकरणी मुद्द्याला बगल द्यायचा प्रयत्न चालविला आहे. पण आम्ही राममंदिर उभारणीबाबत ठाम असल्याचे सांगून आमच्या भूमिकेवर वालम यांनी बोलूच नये, अशा शब्दात त्यांनी अशोक वालम यान्ना फटकारले.
नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेनेने आपली भूमिका सातत्याने स्पष्ट केलेली आहे. आमचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणारबाबत काढलेली अधिसुचना रद्द करीत असल्याची घोषणा सागवे येथे पार पडलेल्या सभेत केली होती.
त्यानंतर उद्योग मंत्रालयाकडुन ती अधिसूचना रद्द करण्यासाठी अवश्यक असलेली पुर्तता केली आहे . पण तो विषय राज्याच्या कॅबिनेटपुढे येणार असून आता ती बाब मुख्यमंत्र्यांच्या अख्त्यारीत असताना त्याचा विचार न करता अशोक वालम सत्ताधारी भाजपाबद्दल काहीच न बोलता केवळ शिवसेनेवरच टिका करीत आहेत.
अशोक वालम यांना कुठलीच राजकीय पार्श्वभूमी नाही. प्रत्येक पक्षाच्या व्यासपीठावर जावून त्यांची वेगवेगळी मते असतात. आपल्या अस्तित्वासाठी वालम यांची जोरदार धडपड सुरु असून त्यातून कसे बाहेर पडायचे याकडे त्यांनी लक्ष द्यावे, असे साळवी म्हणाले.
सभागृहात प्रकल्पविरोधात आवाज उठवू
यापूर्वी रिफायनरी विरोधी संघटनेच्या मुंबई, नागपूरमधील आंदोलनाला आम्ही सहभाग घेतला होता. पण प्रत्येकवेळी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, पालकमंत्री रविंद्र वायकर यांच्यासहित आमदार म्हणून आपल्यावर नाहक टिका करण्यात आली. जर आम्हाला असे अपमानीत केले जाणार असेल तर आंदोलनस्थळी न जाता आम्ही सभागृहात प्रकल्पविरोधात आवाज उठवू, असे सांगून यापुढे वालम यांच्या आंदोलनासमवेत जाण्याचा प्रश्नच येत नसल्याचे आमदार साळवी यांनी ठणकावून सांगितले.