रत्नागिरी : राजापूर कृषी विभागाच्या कारभाराबाबत तक्रार करणार : दीपक बेंद्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 12:51 PM2018-06-11T12:51:49+5:302018-06-11T12:51:49+5:30
कृषी विभागाच्या अनागोंदी कारभाराबाबत आपण आता कृषिमंत्र्यांकडे तक्रार करणार आहोत. आमसभेचा ठराव हेतुपुरस्सर बदलण्यात आल्याप्रकरणी आपण जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती दोनिवडे सरपंच व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष दीपक बेंद्रे यांनी दिली.
राजापूर : कृषी विभागाच्या अनागोंदी कारभाराबाबत आपण आता कृषिमंत्र्यांकडे तक्रार करणार आहोत. आमसभेचा ठराव हेतुपुरस्सर बदलण्यात आल्याप्रकरणी आपण जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती दोनिवडे सरपंच व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष दीपक बेंद्रे यांनी दिली.
तालुका कृषी विभागातील अनागोंदी कारभाराच्या अनुषंगाने आमसभेत उपस्थित करण्यात आलेल्या सूचनेनुसार आयोजित करण्यात आलेली बैठक केवळ फार्स ठरली आहे. या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तालुका कृषी विभागाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे या बैठकीतून काहीही निष्पन्न झालेले नाही.
आमदार राजन साळवी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १२ एप्रिल रोजी पंचायत समितीच्या झालेल्या बैठकीत दीपक बेंद्रे व अन्य काही प्रश्नकर्त्यांनी आंबा नुकसानभरपाईचे सर्वेक्षण, पाणलोटअंतर्गत झालेली कामे यावरून आमसभेत कृषी विभागाला धारेवर धरले होते.
त्यावर सभाध्यक्ष आमदार साळवी यांनी कृषी विभागाच्या तक्रारीच्या अनुषंगाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक घेण्याचे जाहीर केले होते. त्या अनुषंगाने पंचायत समिती किसान भवन सभागृहात ही बैठक झाली.
या बैठकीला आमदार राजन साळवी, उपविभागीय कृषी अधिकारी ए. जी. शाह, रत्नागिरी जिल्हा कृषी अधीक्षक एस. एस. जगताप, तालुका कृषी अधिकारी बी. सी. वाळके, सहाय्यक गटविकास अधिकारी मुरलीधर वाघाटे, प्रश्नकर्ते मंदार सप्रे, संजय सुतार, विजय पाध्ये उपस्थित होते.
या बैठकीत आपण तालुक्यात आंबा, काजू नुकसानाचे संयुक्त सर्वेक्षण, आंबा बागायतदार शेतकरी, सरपंच, पोलीसपाटील, तलाठी व तालुका कृषी अधिकाऱ्यांनी करण्याचे ठरले. मात्र, तहसीलदार, कृषी अधिकारी व गटविकास अधिकारी यांनी संयुक्त पाहणी करून शासनाकडे नुकसानाचा अहवाल सादर केला.
त्यामुळे शासनाच्या नुकसानभरपाईपासून अनेक आपदग्रस्त शेतकरी वंचित राहिले. ज्यांचे नुकसान झाले नाही, अशा शेतकऱ्यांनी त्याचा नाहक फायदा उठवला. याबाबत बैठकीत विचारणा केली असता त्याचे समाधानकारक उत्तर उपस्थित अधिकाऱ्यांना देता आले नाही.
याच अनुषंगाने तालुका कृषी कार्यालयातील कृषी सहाय्यक बी. डी. मराडे हे शेतकऱ्यांशी उध्दट वागतात, शेतकऱ्यांना दिशाभूल करणारी माहिती देतात, त्यामुळे त्यांची बदली करावी, असा ठराव तालुक्यातील ग्रामपंचायतीनी करून तसा प्रस्ताव आमसभेत मांडण्यात आला.
त्यावर चर्चा होऊन कृषी सहाय्यक मराडे यांची जिल्ह्याबाहेर बदली करावी, असा ठराव आपण आमसभेत मांडला, त्याला सर्वानुमते मंजुरी घेण्यात आली. त्यावर काय कार्यवाही झाली, असा प्रश्न आपण उपस्थित केला असता उपस्थित वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांकडून थातुरमातूर उत्तरे देताना मराडे यांनाच पाठीशी घालण्याचा प्रयत्न या बैठकीत झाला.
आमदारांनी या प्रश्नी बैठकीत कठोर भूमिका घेणे आवश्यक असताना त्यांनीही अधिकाºयांची री ओढणे पसंत केले. तालुका कृषी विभागाच्या कारभाराबाबत तक्रार करणार असल्याचे बेंद्रे यांनी सांगितले.
आमसभेतील ठराव बदलला
गतवर्षी झालेल्या तालुका पंचायत समितीच्या आमसभेत तालुका कृषी कार्यालयातील कृषी सहाय्यक बी. डी. मराडे यांच्या बदलीचा ठराव आपण मांडला व त्याला रविंद्र नागरेकर यांनी अनुमोदन दिले.
आमसभेच्या इतिवृत्तात हा ठराव हेतुपुरस्सर बदलण्यात आला. या ठरावाच्या अनुषंगाने मराडे यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न तालुका पंचायत समिती प्रशासनाने केला आहे. यात एका माजी पंचायत समिती पदाधिकाऱ्यांचा सहभाग असून या बाबत आपण जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे ते म्हणाले.