रत्नागिरी : राज्यशासनाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचा मंडणगडमध्ये मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 05:33 PM2018-10-09T17:33:06+5:302018-10-09T17:35:14+5:30
आमदार संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी मंडणगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आज (मंगळवारी) निषेध मोर्चा काढण्यात आला.
मंडणगड : राज्य व केंद्र शासनाने गेली चार वर्षे सतत केलेली महागाई व इतर जाचक अटीच्या विरोधात आमदार संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी मंडणगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आज (मंगळवारी) निषेध मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसह नागरिक सहभागी झाले होते. शासनाच्या कारभाराविषयी जनतेच्या मनात असलेला असंतोष व्यक्त केला.
बाणकोट रोड परकार कॉम्पलेक्स येथील पक्षाच्या कार्यालया समोरून मोर्चाला सुरूवात झाली. मंडणगड बाजारपेठ एस.स्टॅण्ड परिसरात फेरी मारत भिंगळोली येथील तहसील कार्यालयासमोर मोर्चाचा समारोप करण्यात आला.
मोर्चादरम्यान या सरकराचे करायचे काय खाले डोके वरती पाय, एवढी माणसे कशाला या सरकाराच्या मयताला, पैसा पसरला पर्यावरण मंत्री घसरला, लोटे एम.आय.डी.सी. प्रदूषणाने मच्छीमार उद्ध्वस्त, वाहतूक व्यवसाला भरमसाठ कर लादणाऱ्या पर्यावरण मंत्र्याचा निषेध, विकासकामांची खोट पत्रे वाटणाऱ्या पर्यावरण मंत्र्याचा निषेध अशा घोषणा देत पर्यावरण मंत्री, राज्य व केंद्र शासनाच्या कारभाराचा विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला.
शासनाची प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढून राज्यशासनाच्या समारोपाचे अनोखे आंदोलनही करण्यात आले. तहसील कार्यालयाचे आवारात बांधण्यात आलेल्या व्यासपीठावर सभा घेण्यात आली. आमदार अनिकेत तटकरे व आमदार संजय कदम यांनी भाषणे करत मोर्चाला संबोधीत केले. त्यानंतर विविध स्तरातील तेरा प्रमुख मागण्यांसाठी तहसीलदार प्रशांत पानवेकर यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले.