सायकल मॅरेथॉनमधून धावले रत्नागिरीकर, पहिल्याच रॅलीत ४०० जणांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 01:11 PM2018-10-08T13:11:13+5:302018-10-08T13:14:34+5:30
रत्नागिरी सायकल क्लबच्या पुढाकाराने आणि वीरश्री ट्रस्ट, त्रिनिटी हेल्थ क्लब यांच्या विद्यमाने रत्नागिरीत पहिली सायकल मॅरेथॉन झाली. या सायकल मॅरेथॉनमध्ये सुमारे ३०० विद्यार्थी व १०० रत्नागिरीकर सहभागी झाले होते.
रत्नागिरी : रत्नागिरी सायकल क्लबच्या पुढाकाराने आणि वीरश्री ट्रस्ट, त्रिनिटी हेल्थ क्लब यांच्या विद्यमाने रविवारी रत्नागिरीत पहिली सायकल मॅरेथॉन झाली. या सायकल मॅरेथॉनमध्ये सुमारे ३०० विद्यार्थी व १०० रत्नागिरीकर सहभागी झाले होते.
मॅरेथॉन स्पर्धेसाठी आयटीआय- शिवाजीनगर ते हातखंबा व परत शिवाजीनगर हा मार्ग निश्चित करण्यात आला होता. आरोग्यवर्धक आणि इंधनाची बचत करणाऱ्या या आगळ्यावेगळ्या सायकल मॅरेथॉनमध्ये विद्यार्थी, नागरिक उत्स्फूर्तरित्या सहभागी झाले होते.
अशाप्रकारचा उपक्रम दोन महिन्यातून एकदा तरी आयोजित करण्यात यावा, अशी अपेक्षा यावेळी नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत होती. आयटीआय मार्गावरील मंगळवार आठवडा बाजार येथे या मॅरेथॉनचे उद्घाटन सकाळी ६ वाजता पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी झेंडा दाखवला व शंभर नागरिकांनी हातखंब्याकडे कूच केली.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक अनिल विभुते, जिल्हा क्रीडाधिकारी मिलिंद दीक्षित आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर ३०० विद्यार्थ्यांच्या मॅरेथॉनचे उद्घाटन नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्याहस्ते करण्यात आले. रोटरी क्लबचे ज्येष्ठ सदस्य धरमसी चौहान यांनी या मॅरेथॉनला झेंडा दाखवला.
शिवाजीनगर ते हातखंबा या मॅरेथॉन मार्गावर रिकामा टेम्पो, वैद्यकीय व्यवस्था, रूग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली होती. याशिवाय मार्गावर एनर्जी ड्रिंक, पाणी देण्याची व्यवस्था दहा ठिकाणी करण्यात आली होती. त्यासाठी विविध सामाजिक संस्थांचे सहकार्य लाभले. रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे सायकलस्वारांसाठी साळवी स्टॉप येथील चिरायू हॉस्पिटल शेजारील स्टॉलवर पाणी, बिस्कीटे व एनर्जी ड्रिंकची सुविधा करण्यात आली होती.
सायकल ट्रॅक उभारा
रत्नागिरी शहरात दुचाकी, चारचाकी व रिक्षांची वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे रस्त्याने जाताना सायकलस्वारांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते. याकरिता शहरातील रस्त्यांवर स्वतंत्र सायकल ट्रॅक उभारावा, अशी विनंती वीरश्री ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. नीलेश शिंदे यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे केली. जिल्हाधिकाऱ्यांनीही त्याला सहमती दर्शवत नव्या रस्त्यांवर अशी सुविधा देण्याचा मानस असल्याचे सांगितले.