औद्योगिकीकरण, इतर क्षेत्रांमध्ये न झालेल्या प्रगतीमुळे गरिबीत रत्नागिरी राज्यात १३ व्या स्थानावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2021 05:54 PM2021-12-30T17:54:35+5:302021-12-30T17:55:20+5:30
कोकण विभागात सर्वांत गरीब जिल्हा रत्नागिरीच असल्याचे निती आयोगाच्या अहवालावरून दिसत आहे.
रत्नागिरी : औद्याेगिकीकरणाला सातत्याने बसणारी खीळ आणि इतर क्षेत्रांमध्ये न झालेली प्रगती यामुळे रत्नागिरी जिल्हा गरिबीत राज्यात १३ व्या स्थानावर आहे. कोकण विभागात सर्वांत गरीब जिल्हा रत्नागिरीच असल्याचे निती आयोगाच्या अहवालावरून दिसत आहे.
निती आयोगाने देशातील गरिबीचा निर्देशांक जाहीर केला आहे. त्यानुसार रत्नागिरी गरिबीत १३ व्या क्रमांकावर आहे. गेल्या अनेक वर्षांत रोजगाराच्या संधी नसल्याने वर्षानुवर्षे नागरिकांचे मुंबईकडे स्थलांतर सुरूच आहे. उत्पन्नाचे मार्ग बळकट होणार नाहीत, तोवर रत्नागिरीची स्थिती अशीच राहण्याची भीती आहे.
विभागात सर्वाधिक गरीब आम्हीच
कोकण विभागात सर्वांत गरीब जिल्हा रत्नागिरीच आहे. रत्नागिरी राज्यात १३ वा आहे. सिंधुदुर्ग राज्यात २० वा आहे, रायगड जिल्हा राज्यात २१ वा आहे, तर मुंबई हा कोकण विभागातील सर्वांत श्रीमंत जिल्हा आहे. मुंबई- गोवा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील चित्र बदलेल, अशी अपेक्षा केली जात आहे.
राज्यात पहिल्या दहामध्ये कोण?
राज्यातील सर्वांत गरीब जिल्हे म्हणून पहिल्या दहा क्रमांकात खान्देश, विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्हे आहेत. यात नंदुरबार, धुळे, जालना, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, परभणी, बीड, वाशिम व गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे.
कधी बदलणार नशीब?
-पर्यटनातून विकासाच्या गप्पा खूप झाल्या. मात्र, अजूनपर्यंत त्याबाबत ठोस असे काहीच झाले नसल्याने रोजगाराच्या संधी खुंटलेल्याच आहेत.
-१९९५ साली रत्नागिरी हा फलोत्पादन जिल्हा म्हणून घोषणा झाली; पण त्याला अनुसरून बदल न झाल्याने त्यातून विकास झाला नाही.
प्रकल्पांची कास धरली नाही, तर...
विस्तीर्ण समुद्रकिनारा मिळाला असला तरी पर्यटनातून जिल्ह्याचा विकास होण्यावर खूप मर्यादा आहेत. त्यासाठी प्रकल्पांची कास धरणे गरजेचे आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत आलेल्या प्रकल्पांपेक्षा येथून घालवलेल्या प्रकल्पांची संख्याच अधिक आहे. जोपर्यंत मोठे प्रकल्प येणार नाहीत, तोपर्यंत जिल्ह्याचा पर्यायाने जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाचा विकास होणार नाही. जोपर्यंत रोजगाराचे ठोस साधन मिळत नाही, तोपर्यंत गरिबीचे प्रमाण कमी होणे ही अशक्य गाेष्ट आहे. -अविनाश महाजन, राजापूर