रत्नागिरी : गणिते विस्कटून हापूसचा रामराम, ताळमेळ जमेना...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 05:06 PM2018-06-05T17:06:20+5:302018-06-05T17:06:20+5:30

यावर्षी आंबा नाही, हे दरवर्षीचं रडगाणं म्हटलं तर प्रत्यक्षात नेमकी परिस्थिती काय? व आंबा बागायतदारांनी नेमकं किती उत्पादन घेतलं? त्यांना किती फायदा झाला, ही गणितदेखील जाणून घेणे तितकं महत्त्वाचं आहे. यावर्षी मुळातच २५ ते ३० टक्के आंबा उत्पादन झालं. त्यातच नैसर्गिक स्थित्यंत्तर, कोसळलेले दर, वाढता खर्च यांचा ताळमेळ घालीत यावर्षीचा आंबा हंगाम संपला आहे. बाजारात शेवटच्या टप्प्यातील असलेला आंबा आठवडाभरात संपणार आहे.

Ratnagiri: Ratham of the mathematical calculations, reconciliation, ... | रत्नागिरी : गणिते विस्कटून हापूसचा रामराम, ताळमेळ जमेना...

रत्नागिरी : गणिते विस्कटून हापूसचा रामराम, ताळमेळ जमेना...

Next
ठळक मुद्दे गणिते विस्कटून हापूसचा रामराम, ताळमेळ जमेना...नैसर्गिक स्थित्यंत्तर, कोसळलेले दर, वाढता खर्च

रत्नागिरी : यावर्षी आंबा नाही, हे दरवर्षीचं रडगाणं म्हटलं तर प्रत्यक्षात नेमकी परिस्थिती काय? व आंबा बागायतदारांनी नेमकं किती उत्पादन घेतलं? त्यांना किती फायदा झाला, ही गणितदेखील जाणून घेणे तितकं महत्त्वाचं आहे. यावर्षी मुळातच २५ ते ३० टक्के आंबा उत्पादन झालं. त्यातच नैसर्गिक स्थित्यंत्तर, कोसळलेले दर, वाढता खर्च यांचा ताळमेळ घालीत यावर्षीचा आंबा हंगाम संपला आहे. बाजारात शेवटच्या टप्प्यातील असलेला आंबा आठवडाभरात संपणार आहे.

वैशिष्ट्यपूर्ण चवीने भुरळ घातलेल्या आंब्याचे उत्पादन दिवसेंदिवस खालावत चालल्याने शेतकरी चिंतेत आहे. यावर्षी आॅक्टोबरपर्यंत पाऊस झाला. नोव्हेंबरच्या थंडीने आंबा मोहोराला प्रारंभ झाला. मात्र, डिसेंबरमध्ये झालेल्या ओखी वादळाचा फटका पहिल्या टप्प्यातील आंबा पिकाला बसला.

कल्टारसारख्या संजीवकांचा वापर केलेल्या शेतकऱ्यांना आघाडीचे उत्पादन देणारे पिक वाया गेले. दुसऱ्या टप्प्यात मोहोर भरपूर झाला. मात्र, फळधारणा अत्यल्प झाली. तिसऱ्या टप्प्यात अतिथंडीमुळे मोहोरावर थ्रीप्स, तुडतुड्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला. मोहोर काळा पडला. पावसाने उसंत दिल्यामुळे चौथ्या टप्प्यातील आंबा शेतकऱ्यांच्या पदरी पडला. हवामानात सतत होणाऱ्या बदलामुळे यावर्षी शेतकऱ्यांना १५ ते १६ वेळा कीटकनाशकांच्या फवारण्या कराव्या लागल्या.

फेब्रुवारीच्या मध्यावर आंबा बाजारात आला. सुरूवातीला १० हजार रूपये इतका पेटीला भाव देण्यात आला. मात्र, लवकरच तो दर खाली आला. सहा ते पाच हजार रूपये पेटीला मिळू लागला. १५ मार्चनंतर बऱ्यापैकी आंबा बाजारात आला. त्यावेळी दर तीन हजारापर्यत खाली आहे.

पुन्हा १० एप्रिलपर्यंत आंब्याचे दर वाशी मार्केटमध्ये स्थिर होते. दहा एप्रिलनंतर दर गडगडले. ५ मेपर्यंत १२०० ते १५०० रूपये इतका पेटीला भाव होता. १२ मे रोजी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका आंबा पिकाला बसला. जोरदार वाऱ्यामुळे आंबा जमिनीवर आला. त्यामुळे दर पुन्हा घसरले.

८०० ते ७०० रूपये दराने आंबापेटीची विक्री सुरू झाली. गतवर्षी मे महिन्यात वाशी मार्केटमध्ये दिवसाला एक ते दीड लाख पेटी विक्रीला असायची. मात्र, यावर्षी जेमतेम ५० ते ५५ हजार पेटी विक्रीला होती. मे महिन्याच्या शेवटी उष्म्यामुळे आंबा लवकर तयार झाला व एकाचवेळी बाजारात आला. त्यामुळे दर कोसळले.

पेटीला ४०० ते ५०० रूपये दर देण्यात येऊ लागल्याने शेतकऱ्यांनी आंबा मुंबईला पाठविणे बंद केले. स्थानिक मार्केटमध्येही दर फारसा मिळाला नाही. कच्चा आंबा १५० ते २००, तर पिकलेला आंबा २०० ते २५० रूपये डझन दराने विकण्यात येत आहेत. पावसाने उसंत दिल्याने शेतकऱ्यांनी झाडावरचा सर्व आंबा काढला असून, बाजारात पिकलेला व कच्चा आंबा उपलब्ध असला तरी जेमतेम आठवडाभरच हा आंबा विक्रीला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

५४ हजार क्षेत्रावर आंबा लागवड

सन १९९०मध्ये रोजगार हमी योजनेतून आंबा, काजू लागवडीसाठी १०० टक्के अनुदानाची योजना आली आणि कोकणातलं चित्र बदलून गेलं. आंबा कातळावर चांगला वाढतो. पण कातळ जमिनीत खड्डे खोदण्याचा खर्च वाढतो. परंतु कातळावर खड्डे खोदण्यासाठी अनुदान मिळायला लागल्यावर आंब्याची लागवड प्रचंड वाढली आणि सुमारे २६-२७ वर्षात ६० हजार हेक्टर क्षेत्रावर आंब्याची लागवड झाली. आजघडीला यातील ५४ हजार क्षेत्रावरील आंबा लागवड ही उत्पादन देणारी आहे.

सहा महिने राबूनही हाती काहीच नाही

आंबा लागवड पध्दतीत बदल झाला आहे. ४० कलमे असलेल्या बागेत एका एकरसाठी खतसाठीचा खर्च साधारणपणे २० हजार रूपये इतका असतो. पावसाळ्याच्या दिवसात बागेतील साफसफाईसाठी ७० ते ७५ हजार रूपये इतका खर्च येतो. चार महिने जो राखणदार ठेवावा लागतो, त्यासाठी एका माणसाचा कमीत कमी पगार दरमहा आठ ते दहा हजार रूपये इतका द्यावा लागतो.

हापूसचे कलम दरवर्षी उत्पादन देत नाही. त्यापासून एक वर्ष आड उत्पन्न मिळते. त्यामुळे साधारण १५० ते २०० पेट्या हापूस एका एकरामधून मिळतो. या पेट्यांसाठी वाहतूक खर्च आणि हापूसच्या पॅकिंगसाठी खोक्याचा खर्च सुमारे ३५ हजार इतका होता. हा सर्व खर्च लक्षात घेता प्रत्येक पेटीला २००० इतका भाव मिळाला तरच बागायतदाराला तग धरण्याइतकी रक्कम मिळते. अर्थात नोव्हेंबर ते मे असे सहा महिने राबून त्याला एका एकरात दोन लाख रूपये मिळतात.

दर कोसळल्याने नुकसान

यावर्षी उत्पादन कमी असल्याने दर स्थिर राहील, अशी अपेक्षा होती. मात्र, तसे झाले नाही. दर कोसळल्याने १७ रूपये किलो दराने आंबा खरेदी करण्यात आली. तीव्र उष्णतेमुळे आंबा मोठ्या प्रमाणावर तयार झाल्याने बाजारात आंब्याचे प्रमाण वाढले. परंतु दर टिकून न राहिल्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चसुध्दा त्यातून निघू शकला नसल्याची खंत व्यक्त होत आहे.

आर्थिक संकट कायम

औषधे आणि खतांचे वाढलेले अवास्तव दर बागायतदारांना चटका देत आहेत. उत्पादक थेट बाजारात जाऊन आंब्याची विक्री करू शकत नाही. आंबा हे नाशिवंत फळ असल्यामुळे विशिष्ट काळातच त्याची विक्री होणे, ते ग्राहकापर्यंत पोहोचणे गरजेचे असते. यावर्षी विविध संकटाचा सामना करीत आंबा बाजारात आला. परंतु अपेक्षित दर न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना नवीन आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे.
 

Web Title: Ratnagiri: Ratham of the mathematical calculations, reconciliation, ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.