Ratnagiri: रिफायनरी विरोधक नेत्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 09:00 AM2023-04-24T09:00:53+5:302023-04-24T09:01:05+5:30
Ratnagiri Refinery News: रिफायनरी प्रकल्पाविरोधात लोकांना भडकावत असल्याच्या कारणावरून पोलिसांनी प्रकल्प विरोधक नेते सत्यजित चव्हाण आणि मंगेश चव्हाण यांना अटक केली आहे. दोघांनाही तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
- अरुण आडिवरेकर
रत्नागिरी - शासनाकडून रिफायनरी प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत पावले उचलली जात आहेत. बारसू, सोलगाव परिसरात रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेतले जाणार आहे. मात्र, रिफायनरी प्रकल्पाविरोधात लोकांना भडकावत असल्याच्या कारणावरून पोलिसांनी प्रकल्प विरोधक नेते सत्यजित चव्हाण आणि मंगेश चव्हाण यांना अटक केली आहे. दोघांनाही तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
प्रस्तावित भू सर्वेक्षणला विरोध करण्यासाठी स्थानिक लोकांना हिंसक आंदोलन करण्यासाठी सोशल मीडियाव्दारे व रत्नागिरी जिल्ह्यात येऊन चिथावणी देऊन दखलपात्र गुन्ह्याचे योजना आखत असल्याची माहिती रत्नागिरी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे रत्नागिरी पोलिसांनी शनिवारी (२२ एप्रिल) सत्यजित चव्हाण आणि त्याला मदत करणारा मंगेश चव्हाण या दोघांना फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम १५३(१) प्रमाणे ताब्यात घेतले. तसेच ते दखलपात्र गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याने त्यांना प्रतिबंध करण्यासाठी कलम १५१(३) प्रमाणे रविवारी (२३ एप्रिल) रात्री उशिरा राजापूरच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना न्यायालयाने तीन दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश केले आहेत.
बारसू परिसरात होणाऱ्या भू सर्वेक्षणाला काही ग्रामस्थांनी विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. या परिसरात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. रिफायनरी परिसरात जिल्हा प्रशासनाच्या परवानगीशिवाय जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.