मे महिन्यात कोकणात जायचंय?... तडक बुकिंग करा; अनेक ट्रेन झाल्या फुल्ल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:00 PM2018-01-22T12:00:32+5:302018-01-22T13:33:53+5:30
कोकणातून मुंबईत किंवा मुंबईतून कोकणात मे महिन्यात जायचा विचार करत असाल तर जरा लवकर! कारण पुढील तीन ते चार दिवसातच मे महिन्यातील सर्व आरक्षण फुल्ल होण्याच्या मार्गावर आहेत. मे महिन्यातील काही तारखांना तर आतापासूनच प्रतिक्षा यादी लागली आहे. त्यामुळे कोकण किंवा मुंबईत फिरण्यासाठी आता नियोजन करणे गरजेचे बनले आहे.
विहार तेंडुलकर
रत्नागिरी : कोकणातून मुंबईत किंवा मुंबईतून कोकणात मे महिन्यात जायचा विचार करत असाल तर जरा लवकर! कारण पुढील तीन ते चार दिवसातच मे महिन्यातील सर्व आरक्षण फुल्ल होण्याच्या मार्गावर आहेत. मे महिन्यातील काही तारखांना तर आतापासूनच प्रतिक्षा यादी लागली आहे. त्यामुळे कोकण किंवा मुंबईत फिरण्यासाठी आता नियोजन करणे गरजेचे बनले आहे.
मे हा पर्यटन हंगामातील शेवटचा महिना मानला जातो. मे महिन्यात शाळा, महाविद्यालये बंद असल्याने पर्यटन हंगामातील अन्य कालावधीपेक्षा याच महिन्यात अनेकजण पर्यटनासाठी घराबाहेर पडतात. रेल्वेने आता चार महिने अगोदर आरक्षणची सुविधा उपलब्ध करून दिल्याने आता अनेकजण चार महिने अगोदरच पर्यटनाचे नियोजन करू लागले आहेत.
स्वस्तात मस्त पर्याय म्हणून अलिकडे रेल्वेला सर्वाधिक पसंती मिळू लागली आहे. त्यामुळे अनेकवेळा फिरण्याचे नियोजन आयत्यावेळी किंवा महिनाभर अगोदर केले तर आरक्षण मिळणे दुरापास्त होऊन जाते. चार महिने अगोदर आरक्षण मिळायला लागल्यापासून आणि मे महिना हा सुट्टीचा हंगाम असल्याने जानेवारीतच मे महिन्यातील पर्यटनाची निश्चिती होते.
मे महिन्यातील पर्यटन हंगामाचा आता रेल्वेवरही परिणाम झाल्याचे दिसून येते. कोकण रेल्वेच्या अनेक गाड्या या फुल्ल होण्याच्या मार्गावर आहेत. मे महिन्यातील शनिवार, रविवार वा अन्य शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी तर आतापासूनच रेल्वे आरक्षण फुल्ल आहे. केवळ ठराविक गाड्यांचीच १५ ते २० यादरम्यान आरक्षण सीट उपलब्ध आहेत. पुढील चार ते पाच दिवसात तीसुध्दा संपून जाण्याची शक्यता आहे.
१५ मेसाठीचे आरक्षण पाच दिवसांपूर्वीपासून सुुरु झाले. सद्यस्थितीत मत्स्यगंधा एक्स्प्रेस फुल्ल होण्याच्या मार्गावर आहे तर २० मेचे आरक्षण आधीच फुल्ल झाले आहे. रत्नागिरी-दादर पॅसेंजर तसेच सावंतवाडी दिवा गाडीची आरक्षित तिकीटे सध्या १०० ते १२५ यादरम्यान उपलब्ध आहेत. सुट्टीचा दिवस फुक्कट घालवण्यापेक्षा रात्रीचा प्रवास करून पहाटेच पर्यटनस्थळापर्यंत वा आपल्या गावापर्यंत पोहोचण्यासाठी रात्रीच्या रेल्वेगाड्यांना अधिक पसंती प्रवाशी देत असल्याचे चित्र आहे.
या रेल्वेगाड्या आतापासूनच फुल्ल
मांडवी एक्स्प्रेसगाडी तर आतपासूनच फु्ल्ल आहे. या गाडीची प्रतिक्षा यादी ८ ते १५ यादरम्यान आहे. अगदी तुतारी एक्स्प्रेसही १५, १९ आणि २० मे यादरम्यान फुल्ल आहे. कोकणकन्या एक्स्प्रेसच्या ८ ते १० सीटच सध्या उपलब्ध आहेत. त्याही पुढील पाच दिवसात फुल्ल होण्याची शक्यता आहे.
तेजसलाही प्रतिसाद
तेजस एक्स्प्रेसला एरव्ही महागड्या भाड्यामुळे कमी प्रतिसाद मिळतो. ही रेल्वेगाडीही आता फुल्ल होण्याच्या मार्गावर आहेत. मागील पाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणावर आरक्षणं झाली की, आता केवळ या एक्स्प्रेसचे ५४ ते ७२ एवढ्याच सीट उपलब्ध आहेत.
रात्रीच्या गाड्यांना अधिक पसंती
दिवसाच्या प्रवासापेक्षा सध्या रात्रीच्या प्रवासाला सर्वाधिक पसंती दिली जाते. त्यामुळे कोकणकन्या, तुतारी एक्स्प्रेस या गाड्या आतपासूनच फुल्ल होऊ लागल्या आहेत. कोकणात येणाऱ्या गाड्यांपेक्षा कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या अधिक फुल्ल आहेत. तर एप्रिलचा दुसरा पंधरवडा ते मेचा पहिला पंधरवडा यादरम्यान कोकणाकडे येणाऱ्या रेल्वेगाड्यांना गर्दी असल्याचे चित्र आहे.