सागरी परिक्रमा यात्रेची आज रत्नागिरीत सांगता, केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसायमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती
By शोभना कांबळे | Published: May 17, 2023 05:38 PM2023-05-17T17:38:07+5:302023-05-17T17:38:36+5:30
केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसायमंत्री पुरशोत्तम रूपाला तसेच पालकमंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत.
शोभना कांबळे
रत्नागिरी : सागर परिक्रमा कार्यक्रम-२०२३ (तृतीय चरण) गुजरात येथून सुरू झालेल्या सागर परिक्रमा यात्रेची सांगता गुरुवार, १८ मे रोजी शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात होणार आहे. भारत सरकारच्या मत्स्यपालन विभागाने (Fisheries Department) “आजादी का अमृत महोत्सव” अंतर्गत ही यात्रा आयोजित केली असून सांगता कार्यक्रमाला केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसायमंत्री परशोत्तम रूपाला तसेच पालकमंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत.
सागर परिक्रमा कार्यक्रम-२०२३ (तृतीय चरण) गुजरात येथून सुरू झालेल्या सागर परिक्रमा यात्रेला दि.२० फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्यातील सातपाटी येथून प्रारंभ झाला आहे. ही यात्रा “देशाची अन्नसुरक्षा, किनारपट्टीवर निवास करणाऱ्या मच्छीमारांची उपजीविका आणि सागर पर्यावरणाची सुरक्षा” या मुद्यांवर केंद्रित आहे. या सागर परिक्रमा यात्रेचे हे पाचवे चरण उरण तालुक्यातील करंजा येथून दि. १७ मे २०२३ रोजी सुरू होऊन दि. १८ मे रोजी रत्नागिरी येथे समाप्त होईल. ही सागर परिक्रमा यात्रा करंजा, मिरकरवाडा व मिऱ्या बंदर व स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह येथे होणार आहे.
या यात्रेतून प्रगतशील मच्छीमार मुख्यत्वे किनारी भागात निवास करणारे मच्छीमार, मत्स्य शेतकरी, तरुण मत्स्य उद्योजक आदींना प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY), केसीसी FIDF आणि महाराष्ट्र राज्याच्या मत्स्य व्यवसायविषयक योजनांची माहिती दिली जाणार आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री परशोत्तम रूपाला व राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत तसेच जिल्ह्यातील सर्व लोकसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, विधानसभा सदस्य आणि राज्य व केंद्र शासनाचे वरिष्ठ सनदी अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या परिक्रमेत राज्याचे मत्स्य अधिकारी, मच्छीमारांचे प्रतिनिधी, मत्स्य व्यावसायिक, मत्स्य उद्योजक, मत्स्यसंवर्धक, अधिकारी आणि राज्य, देशभरातील मत्स्य शास्त्रज्ञ सहभागी होणार आहेत.
किनारपट्टीवर राहणाऱ्या मच्छीमारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मच्छीमार, मस्य व्यवसायाशी निगडित असलेल्या समुदायाशी आणि हितधारकांशी संवाद साधणे, हा या यात्रेचा उद्देश असून ही परिक्रमा संपूर्ण देशाच्या किनारपट्टीवरील राज्याच्या समुद्रमार्गातून जाणार आहे. दुपारी ४ ते रात्री ८:३० वाजेपर्यंतच्या स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात होणाऱ्या या कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांनी, मत्स्य व्यावसायिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मत्स्यविभागाचे सहाय्यक आयुक्त ना. वि. भादुले यांनी केले आहे.