रत्नागिरीच्या सखी वन स्टाॅप सेंटरला देशात दुसरे स्थान, पोस्टर मेकिंग स्पर्धेत पटकावला क्रमांक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 01:56 PM2022-03-05T13:56:07+5:302022-03-05T13:56:30+5:30
या स्पर्धेसाठी देशभरातून ७०४ वन स्टॉप सेंटरनी सहभाग घेतला होता.
रत्नागिरी : भारत सरकार महिला व बाल विकास मंत्रालयातर्फे ‘परियोजना स्त्री मनोरक्षद्वारा एक पहल’यांच्यातर्फे दिल्ली येथे जागतिक महिला दिन सप्ताह साजरा करण्यात आला. यामध्ये देशभरातील सर्व सखी वन स्टॉप सेंटरची दोन दिवसीय जागतिक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यानिमित्त घेण्यात आलेल्या पोस्टर मेकिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या सखी वन स्टाॅप सेंटरने देशात दुसरा क्रमांक पटकावला.
पोस्टर मेकिंग स्पर्धेकरिता हिंसामुक्त, सुरक्षित आणि लैंगिक समानता असणाऱ्या घराची संकल्पना तसेच हिंसेचा सामना करणाऱ्या महिलांना मदत करण्याचे उपाय हे दोन मुख्य विषय ठेवण्यात आले होते. या स्पर्धेसाठी देशभरातून ७०४ वन स्टॉप सेंटरनी सहभाग घेतला होता. त्यामधून रत्नागिरीच्या सखी वन स्टॉप सेंटरने देशामध्ये दुसरा क्रमांक पटकावला.
हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी सखी सेंटरच्या केंद्र प्रशासक अश्विनी पवनकुमार मोरे या उपस्थित होत्या. महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांच्याहस्ते अश्विनी माेरे यांनी पारिताेषिक स्वीकारले. हा कार्यक्रम स्त्री मनोरक्षाचे प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर डॉ. प्रभा चंद्रा, को- इन्व्हेस्टिगेटर डॉ. विना सत्यनारायणन, को- इन्व्हेस्टिगेटर डॉ. किम्नेइहत वायफेई यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
भारत सरकार महिला व बाल विकास मंत्रालयातर्फे परियोजना स्त्री मनोरक्षद्वारा एक पहल पोस्टर मेकिंग स्पर्धेमध्ये सखी वन स्टेप सेंटर रत्नागिरीला देशात दुसऱ्या क्रमांकाचे मिळालेले पारितोषिक गौरवास्पद आहे. हे पारितोषिक स्वीकारताना मला खूप आनंद होत आहे. तसेच सखींची वाटचाल अशीच यापुढेही सुरू राहील, अशी मला खात्री आहे. गेल्या वर्षभरात सखी सेंटरमध्ये हिंसाचाराच्या १७० हून अधिक केसेस दाखल झाल्या असून, त्यांना न्याय देण्यामध्ये सखी सेंटरने उल्लेखनीय यश मिळवले आहे. - अश्विनी माेरे, प्रशासक, सखी सेंटर केंद्र, रत्नागिरी.