रत्नागिरी : सावरकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन परिवर्तन करावे : अभिजीत घोरपडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 04:16 PM2018-05-31T16:16:27+5:302018-05-31T16:16:27+5:30
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांची देशभक्ती असामान्य होती. त्यांचे देशासाठी योगदान फार मोठे आहे. त्यांना असंख्य यातनादेखील सोसाव्या लागल्या. या महान पुरूषाच्या जयंतीदिनी बंदिवानांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन परिवर्तन करावे, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे यांनी केले.
रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांची देशभक्ती असामान्य होती. त्यांचे देशासाठी योगदान फार मोठे आहे. त्यांना असंख्य यातनादेखील सोसाव्या लागल्या. या महान पुरूषाच्या जयंतीदिनी बंदिवानांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन परिवर्तन करावे, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे यांनी केले.
वीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई व रामचंद्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील कारागृहातील बंदिवानांसाठी निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा रत्नागिरी कारागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित घोरपडे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा कारागृह अधीक्षक आर. आर. देशमुख, पतित पावन मंदिराचे अध्यक्ष अॅड. बाबासाहेब परूळेकर, डॉ. श्रीकृष्ण जोशी उपस्थित होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंदमान कारागृहात असताना सोबत असलेल्या बंदिवानांमध्ये राष्ट्रभक्ती रूजवून त्यांच्यातून अनेक देशभक्त निर्माण केले होते. सावरकरांनी लिहिलेल्या ग्रंथाच्या आधारे त्यांचे विचार बंदिवानांमधून रूजवून आणि निबंधांतून ते उतरून त्यांच्यातून देशासाठी कार्य करण्याची प्रेरणा जागृत करण्याचा उपक्रम निबंध स्पर्धेव्दारे आयोजित केला होता.
महाराष्ट्रातील येरवडा, मुंबई, ठाणे, नाशिक रोड, सातारा, भायखळा, रत्नागिरी कारागृहातील पुरूष व महिला बंदिवानांमध्ये राष्ट्रभक्ती वाढीस लागावी, यासाठी निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत या स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेतून प्रथम तीन क्रमांक घोषित करून विजेत्यांना रोख रकमेचे पारितेषिक, प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष अरूण जोशी, कार्याध्यक्ष रणजित सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्नुषा स्वामिनी विक्रम सावरकर, डॉ. नारायण सावरकर यांच्या कन्या स्नेहलता साठे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाह राजेंद्र वराडकर, मुकुंद गोडबोले, मंदाकिनी भट, सुमेधा मराठे, अशोक शिंदे, नयना शिंदे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रास्ताविक आर. आर. देशमुख यांनी केले. तुरूंगाधिकारी अमेय पोतदार यांनी सूत्रसंचालन केले.
दुचाकी रॅली
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त ब्राह्मण जागृती सेवा संघातर्फे शहरातून दुचाकी फेरी काढण्यात आली. मारूती मंदिर येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दुचाकी फेरीला प्रारंभ झाला. ही फेरी मारूती मंदिर, जुना माळनाका, जयस्तंभ, बसस्थानक, आठवडा बाजार, काँग्रेस भुवन मार्गे टिळकआळी त्यानंतर शेरेनाका मार्गे लक्ष्मीचौक येथील सावरकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.