रत्नागिरी : खेडमध्ये दुसऱ्यांदा अजगर पकडला, नैसर्गिक अधिवासात सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 04:31 PM2018-11-03T16:31:43+5:302018-11-03T16:32:38+5:30
खेड तालुक्यात गेल्या महिनाभरापासून लोकवस्तीत अथवा परिसरात विवीध प्रजातींचे साप आढळण्याचे प्रमाण वाढले असून आठवडाभराच्या कालावधीतच खेड शहरात दुसऱ्यांदा एक महाकाय अजगर शहरातील मदिना चौकातील एका घरात आढळला. या अजगराला सर्पमित्रांनी पकडून वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुखरूप नैसर्गिक अधिवासात सोडले.
खेड : तालुक्यात गेल्या महिनाभरापासून लोकवस्तीत अथवा परिसरात विवीध प्रजातींचे साप आढळण्याचे प्रमाण वाढले असून आठवडाभराच्या कालावधीतच खेड शहरात दुसऱ्यांदा एक महाकाय अजगर शहरातील मदिना चौकातील एका घरात आढळला. या अजगराला सर्पमित्रांनी पकडून वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुखरूप नैसर्गिक अधिवासात सोडले.
कोकणातील ग्रामीण भागात शेतीची कामे वेगाने सुरू झाली आहेत. त्यामुळे पावसाळ्याच्या कालावधीत शेतामध्ये आश्रय घेतलेले विवीध प्रजातीचे साप आता अन्य ठिकाणी स्थलांतरीत होऊ लागले आहेत. मात्र याच कालावधीत गेल्या महिनाभरात शहर व ग्रामीण भागातील लोकवस्तीच्या परिसरात अनेक प्रजातीचे साप आढळून येवू लागले आहेत. मागील आठवड्यात तालुक्यातील मुरडे गावात सुमारे ११ फुट लांबीचा विशालकाय अजगर घरात आढळून आला होता.
या अजगराला पाहिल्यानंतर घाबरलेल्या नागरिकांनी सर्पमित्रांना पाचारण केले होते. त्यानंतर सर्पमित्रांनी त्याला पकडून सुरक्षितस्थळी सोडून दिले होते. या घटनेनंतर काही दिवसाच्या आतच शहरातील मदीना चौकातील सिकंदर मुसा यांच्या घराच्या पहिल्या मजल्यावर सुमारे दहा फूट लांबीचा अजगर आढळला.
या अजगराची माहिती मिळताच सर्पमित्र ओंकार चिखले व प्रतिक जाधव यांना परिसरातील नागरिकांनी संपर्क साधला. माहिती मिळताच चिखले व जाधव सहका-यांसोबत तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अजगराला सुरक्षीतरीत्या पकडले. वनविभागाच्या सहकार्याने या अजगराला सुरक्षितस्थळी जंगलात सोडण्यात आले.