रत्नागिरी : कोतवलीतील मृत मगरीचा व्हिसेरा पाठवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 04:40 PM2018-12-26T16:40:15+5:302018-12-26T16:41:25+5:30
कोतवली टेपवाडी-भोईवाडी परिसरातील खाडीपात्रात रविवारी कुजलेल्या अवस्थेत आढळलेल्या मगरीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा उलगडा अद्याप झालेला नाही. मृत मगरीचे विच्छेदन करून व्हिसेरा तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे.
खेड : कोतवली टेपवाडी-भोईवाडी परिसरातील खाडीपात्रात रविवारी कुजलेल्या अवस्थेत आढळलेल्या मगरीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा उलगडा अद्याप झालेला नाही. मृत मगरीचे विच्छेदन करून व्हिसेरा तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे.
दरम्यान मृत्युमुखी पडलेल्या मगरीस घटनास्थळानजीक अग्नी देऊन विल्हेवाट लावण्यात आल्याची माहिती येथील वनाधिकारी अनिल दळवी यांनी दिली. लोटे औद्योगिक वसाहतील रासायनिक कारखान्यातून परिसरातील खाडीपात्रात सोडण्यात येणाऱ्या दूषित पाण्यामुळे मगरीचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत दयार्सारंग भोई विकास संघटना आक्रमक झाली आहे.
नदी व खाड्यांमध्ये होणाऱ्या जलचर प्राण्यांच्या मृत्यूस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जबाबदार आहे. मगरीच्या मृत्यू प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी दयार्सारंग भूमिका संघटनेचे अध्यक्ष सुनील जाधव यांनी केली आहे.
गेल्या सात महिन्यात मृत मगर आढळून येण्याची तिसरी घटना असून या मगरीच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यात वनविभाग प्रशासनास अपयश आले आहे. प्रशासनाला मगरींच्या मृत्यूचे काहीच गांभीर्य नाही का असा संतप्त सवालही उपस्थित केला जात आहे.
आणखी किती मगरी बळी गेल्यावर प्रशासन जागे होऊन उपाययोजना करणार असा प्रश्?न उपस्थित केला जात आहे. दरम्यान मृतावस्थेत आढळणाऱ्या मगरींच्या मृत्यू औद्योगिक वसाहतीतील दूषित पाणी सोडणारे कारखाने जबाबदार आहेत लवकरच सीईटीपीवर मोर्चा काढण्याचा इशारा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सतीश चिकणे यांनी दिला आहे.