रत्नागिरी : प्रवासी जलवाहतूक सेवा तत्काळ बंद करण्याच्या आदेशाने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 04:35 PM2018-02-13T16:35:57+5:302018-02-13T16:45:17+5:30
संगमेश्वर तालुक्यातील करजुवे - भातगाव या दोन गावांसह चार तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा एकमेव पर्यायी खाडीतील नौका प्रवास आता थांबणार आहे. बंदर विभाग, रत्नागिरीने येथील प्रवासी वाहतूक सेवा तत्काळ बंद करण्याचे पत्र दिले असून, या पत्राने करजुवे, माखजन, सावर्डेसह अन्य ठिकाणी जाणाऱ्या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील करजुवे - भातगाव या दोन गावांसह चार तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा एकमेव पर्यायी खाडीतील नौका प्रवास आता थांबणार आहे. बंदर विभाग, रत्नागिरीने येथील प्रवासी वाहतूक सेवा तत्काळ बंद करण्याचे पत्र दिले असून, या पत्राने करजुवे, माखजन, सावर्डेसह अन्य ठिकाणी जाणाऱ्या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. ऐन परीक्षा काळात या विद्यार्थ्यांसाठी हा विषय अडचणीचा ठरणार आहे.
भातगाव - करजुवेसह संगमेश्वर, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी आदी ठिकाणी जाण्यासाठी ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांना भातगाव खाडीतून नौका बोट हा एकमेव पर्याय आहे. हा भाग नैसर्गिकदृष्ट्या अत्यंत दुर्गम आहे. यामुळे भातगाव - करजुवे याठिकाणी कोणतीही वैद्यकीय सुविधा तसेच उच्चशिक्षणाची सुविधा उपलब्ध नाही.
इथल्या प्रत्येकाला रोजगारासाठी अथवा शासकीय कामासाठी, बाजारहाट करण्यासाठी या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी होडी हाच एकमेव पर्याय आहे. याठिकाणी आजारी व्यक्तीला उपचारांसाठीही होडीतूनच माखजन, डेरवण अथवा अन्यत्र घेऊन जावे लागते. याठिकाणी पूल नसल्याने होडीशिवाय दुसरा पर्याय नसल्याने साऱ्यांसाठीच अडचण निर्माण झाली आहे.
सध्या भातगाव, कोसबी आदी ठिकाणांहून १०वी, १२वीतील सुमारे ६० विद्यार्थी करजुवे, माखजन, सावर्डेसह अन्य ठिकाणी शिक्षणासाठी जातात. मात्र, अचानक येथील होडी बंद केल्यामुळे या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारमय होणार आहे. दहावी व बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरु झाल्या आहेत.
या परीक्षांना होडी बंदच्या निर्णयामुळे मुकावे लागण्याची भीती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे. याबाबत होडी चालकांशी संपर्क साधला असता, बंदर विभागाच्या अटींची पूर्तता केली आहे. नौका सर्वेक्षण वैध प्रमाणपत्रासाठी लागणारी सर्व कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी मिळाल्यास पूर्ण करणार असल्याचे सांगितले.
येथील नौकाचालक हे निरक्षर असून, त्यांची परिस्थिती हलाखीची आहे. केवळ विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करुन त्यांनी होडी सुरु ठेवली होती. परंतु अचानक आलेल्या बंदर विभागाच्या पत्रामुळे सध्या ही होडी बंद ठेवण्यात आली आहे.