रत्नागिरी : चैत्रीपर्यंत साजरा होतो नेवरे गावातील शिमगोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 11:17 AM2018-04-06T11:17:12+5:302018-04-06T11:17:12+5:30
शिमगोत्सव म्हटला की, महिनाभराचा उत्सव, मुंबईकरांसह स्थानिक ग्रामस्थही भक्तिभावाने हा उत्सव साजरा करतात. काही ठिकाणी जास्तीत जास्त हा उत्सव गुढीपाडव्यापर्यंत चालतो. मात्र, रत्नागिरी तालुक्यातील नेवरे गावचे ग्रामदैवत श्री आदित्यनाथाचा शिमगोत्सव हा तब्बल दीड महिना चालतो. दीड महिना विविध कार्यक्रमांची रेलचेल आणि पालखी सोहळा असा हा उत्सव गावात सुरु असतो.
रत्नागिरी : शिमगोत्सव म्हटला की, महिनाभराचा उत्सव, मुंबईकरांसह स्थानिक ग्रामस्थही भक्तिभावाने हा उत्सव साजरा करतात. काही ठिकाणी जास्तीत जास्त हा उत्सव गुढीपाडव्यापर्यंत चालतो. मात्र, रत्नागिरी तालुक्यातील नेवरे गावचे ग्रामदैवत श्री आदित्यनाथाचा शिमगोत्सव हा तब्बल दीड महिना चालतो. दीड महिना विविध कार्यक्रमांची रेलचेल आणि पालखी सोहळा असा हा उत्सव गावात सुरु असतो.
ग्रामदैवत श्री आदित्यनाथाचे प्राचीन सूर्यमंदिर आहे. शिमगोत्सवाला शंभरपेक्षा अधिक वर्षे लोटली आहेत. कालपरत्वे उत्सवाचे रूपही पालटले असून, ते व्यापक झाले आहे. दीड महिन्याच्या कालावधीत बारा वाड्यांमधील ६४० घरांमध्ये पालखी पूजेकरिता येत असल्याने भाविक दर्शनाकरिता हमखास घरी येतात.
होळी पौर्णिमेच्या एक दिवस आधी ग्रामदेवतेला रूपे लावून पालखीत देव विराजमान होतात. त्यानंतर पालखी होळी तोडण्याच्या ठिकाणी नेली जाते. होळी उत्सव पारंपरिक पध्दतीने साजरा होतो. होळी पौर्णिमेच्या आधी सुरू झालेला हा शिमगोत्सव आजही सुरू असून १५ एप्रिलला सांगता होणार आहे.
ढोकमळे, मुरूगवाडा, उंबरवाडी, देवपाटवाडी, लावगणवाडी, नवेदरवाडी, कुंभारवाडी, बाजारपेठ, गुरववाडी, चिंचवणे, पेडणेकरवाडी, काजिरभाटी, मोरेवाडी येथील घरोघरी जाऊन ग्रामदेवतेची पालखी पूजा स्वीकारते. हा उत्सव जवळपास दीड महिना सुरु असतो. जिल्ह्यातील एवढा दीर्घ काळ चालणारा हा एकमेव शिमगोत्सव असावा.
कार्यक्रमाची रेलचेल
सुरूवातीला शिमगोत्सवाचे स्वरूप मर्यादित होते. मात्र, आता त्याला व्यापकता आली आहे. प्रत्येक वाडीसाठी किमान दोन ते चार दिवस देण्यात आले आहेत. त्यामुळे १४ एप्रिलपर्यंत हा उत्सव चालणार असून, १५ रोजी पालखी मंदिरात परतणार आहे. प्रत्येक वाडीत देवीचा मांड साजरा करण्यात येत असल्यामुळे कार्यक्रमांसमवेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, हळदी-कुंकू, नमन, नाटक आयोजित करण्यात येत आहे.
विशिष्ठ धर्मापुरताच मर्यादित नाही
श्री आदित्यनाथ मंदिर प्राचीन आहे. त्यामुळे ग्रामदेवतेच्या शिमगोत्सवाने नक्कीच शतक पाहिले आहे. गावातील मुस्लिम बांधवदेखील दरवर्षी भक्तिभावाने होळीसाठी नारळ अर्पण करीत असतात, त्यामुळे हा सण केवळ विशिष्ट धर्मापुरताच मर्यादित नाही. वाडीनिहाय विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.
दीड महिन्याचा शिमगोत्सव उत्साहाने व शांततेत साजरा केला जातो. भाविकांची उपस्थिती हे शिमगोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. शिमगोत्सवाची सांगता पालखी मंदिरात परतल्यानंतर रूपे काढून ठेवली जातात.
- सुनील रेवाळे, सचिव,
श्री आदित्यनाथ, देवी भगवती माता देवस्थान कमिटी, नेवरे.