रत्नागिरी : शिवसेनाच अव्वलस्थानी; राष्ट्रवादीची पीछेहाट, भाजपची ताकद आणि लोकप्रतिनिधी वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:48 PM2018-04-14T12:48:43+5:302018-04-14T12:48:43+5:30
देवरूख आणि गुहागर नगर पंचायत निवडणुकीनंतर आता पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या चर्चेला वेग आला आहे. शिवसेना आता शहरी भागातही विस्तारली असून, जिल्ह्यात आजच्या घडीला शिवसेनाच अव्वल असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीची मात्र काहीशी पीछेहाट झाली असून, भाजपने चिपळूण पाठोपाठ देवरूखमध्येही यश मिळवले आहे.
रत्नागिरी : देवरूख आणि गुहागर नगर पंचायत निवडणुकीनंतर आता पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या चर्चेला वेग आला आहे. शिवसेना आता शहरी भागातही विस्तारली असून, जिल्ह्यात आजच्या घडीला शिवसेनाच अव्वल असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीची मात्र काहीशी पीछेहाट झाली असून, भाजपने चिपळूण पाठोपाठ देवरूखमध्येही यश मिळवले आहे.
लोकसभा निवडणुकीपासूनचा विचार केला, तर जिल्ह्यात एकूण मतांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक वाटा शिवसेनेला मिळाला. विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्येही हाच निकाल कायम होता. दीड वर्षापूर्वी झालेल्या पाच नगर परिषदांच्या निवडणुकांमध्येही पन्नास टक्के जागा शिवसेनेने मिळवल्या होत्या. आताच्या निवडणुकीत शिवसेनेच्या नावावर कमी संख्या दिसत असली तरी गुहागरमधील शहर विकास आघाडीला सेनेचा पाठिंबा आहे. त्यामुळे सेनेचे पारडे जड आहे.
राष्ट्रवादी हा जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. मात्र, या दोन निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची मोठी घसरण झाली आहे. गुहागरमधील पीछेहाट हा राष्ट्रवादीसाठी मोठाच धक्का आहे. त्या तुलनेत भाजपने अनपेक्षित यश मिळवले आहे. चिपळूणनंतर आता देवरूखचे नगराध्यक्षपदही भाजपकडे आले आहे. अर्थात चिपळुणात भाजपकडे नगरसेवकांचे बळ कमी होते.
देवरूखात सर्वांत जास्त नगरसेवक भाजपचे आहेत. गुहागरमध्ये भाजपला मिळालेल्या ६ जागा कौतुकास्पद नसल्या तरी नोंद घेण्याइतक्या आहेत. गेली काही वर्षे जिल्हाध्यक्ष नसलेल्या काँग्रेसला देवरूख, गुहागरमध्ये अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही.
शहरी भागांवर शिवसेनेचे लक्ष
शिवसेना हा पूर्वी ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांचे पाठबळ असलेला पक्ष मानला जात होता. मात्र, गेल्या काही नगर परिषद/पंचायत निवडणुकांमध्ये शहरी भागातही शिवसेनेने मोठे यश मिळवले आहे. शिवसेनेने शहरी भागांमध्ये विशेष लक्ष देण्यास सुरूवात केली असून, २०१९च्या विधानसभा निवडणुकांची ही तयारीच मानली जात आहे.