रत्नागिरीत शिवसेनेने बॅनर फाडले, भाजपने काही मिनिटांतच लावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:37 AM2021-08-25T04:37:09+5:302021-08-25T04:37:09+5:30
रत्नागिरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे मंगळवारी रत्नागिरी शहरातही पडसाद उमटले. शहरातील मारुती मंदिर येथे भाजपकडून नारायण ...
रत्नागिरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे मंगळवारी रत्नागिरी शहरातही पडसाद उमटले. शहरातील मारुती मंदिर येथे भाजपकडून नारायण राणे यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले बॅनर आमदार राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली फाडण्यात आले; परंतु काही मिनिटांतच भाजपच्या कार्यकर्त्यांनी नवे बॅनर त्याच ठिकाणी पुन्हा झळकावले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वादग्रस्त विधानानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटू लागले. शिवसेनेने राज्यभर आंदाेलन करत मंत्री राणे यांचा निषेध केला. शिवसेनेच्या या आंदाेलनाचे पडसाद रत्नागिरी शहरातही उमटले. जन आशीर्वाद यात्रा रत्नागिरीत येणार असल्याने ठिकठिकाणी मंत्री राणे यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले हाेते. ही यात्रा रत्नागिरीत येणापूर्वी शिवसेनेचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथे आंदाेलन करण्यात आले. त्यानंतर भाजपतर्फे लावण्यात आलेले बॅनर फाडण्यात आले व जाेरदार घाेषणाबाजी करण्यात आली. या आंदाेलनात सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, विधानसभा क्षेत्राध्यक्ष प्रमाेद शेरे, उपजिल्हाप्रमुख महेश म्हाप, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, संजय साळवी, बिपीन बंदरकर यांच्यासह महिला पदाधिकारी सहभागी झाल्या हाेत्या.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपने लावलेले बॅनर फाडल्याचे कळताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ नवीन बॅनर बनवून घेतले. शिवसेनेने फाडलेल्या बॅनरच्या ठिकाणी पुन्हा नव्याने काही मिनिटांतच हे बॅनर लावण्यात आले.
-----------------
पाेलिसांना निवेदन
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर कारवाई करण्याबाबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी जिल्हा पाेलीस अधीक्षकांकडे मंगळवारी निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी हे प्रकरण अत्यंत गंभीर व संवेदनशील आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीररीत्या समाजात बदनामी झालेली असल्याने नारायण राणे यांची वक्तव्ये ही भा.दं.वि. संहितेच्या विविध तरतुदींप्रमाणे गुन्ह्याचे कृत्य आहे. तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल हाेऊन कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित हाेते.