रत्नागिरीत शिवसेना उपशहरप्रमुखाचे केशकर्तनालय फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 12:06 PM2018-08-23T12:06:11+5:302018-08-23T12:07:24+5:30
राजकीय वैमनस्यातून उफळलेल्या वादाची ठिणगी पुन्हा उडाली. एक टीव्ही शोच्या लाईव्ह कार्यक्रमात झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर मंगळवारी जशासतसे उत्तर देण्यासाठी इनोव्हातून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी शिवसेना उपशहर प्रमुख श्रीकृष्ण उर्फ बावा चव्हाण यांचे केशकर्तनालयाची तोडफोड करून मारहाण केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली.
रत्नागिरी : राजकीय वैमनस्यातून उफळलेल्या वादाची ठिणगी पुन्हा उडाली. एक टीव्ही शोच्या लाईव्ह कार्यक्रमात झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर मंगळवारी जशासतसे उत्तर देण्यासाठी इनोव्हातून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी शिवसेना उपशहर प्रमुख श्रीकृष्ण उर्फ बावा चव्हाण यांचे केशकर्तनालयाची तोडफोड करून मारहाण केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली.
या घटनेनंतर पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. यावेळी त्यांचे समवेत आमदार राजन साळवीदेखील होते. या तोडफोडीनंतर रात्री रत्नागिरी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सोमवारी माळनाका परिसरात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका टीव्ही चॅनलने लाईव्ह कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात शिवसेना आणि स्वाभिमान कार्यकर्त्यांमध्ये खटका उडाला होता. शिवसेनेचे उपनेते आमदार उदय सामंत पालकमंत्री असतानाचा जुना व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने दाखविल्याने शिवसैनिकांनी आक्षेप घेत हंगामा केला, त्यांनतर चुकीच्या पद्धतीने व्हिडीओ दाखविणाऱ्या स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्याला शिवसैनिकांनी मारहाण केली होती. या मारहाणीनंतर वादावर पडदा टाकण्यात आला.
पक्षाच्या कार्यकर्त्याला झालेली मारहाण आणि मारहाणीचा व्हायरल झालेला व्हिडीओ यामुळे स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांत असंतोष निर्माण झाला होता. त्यातूनच मंगळवारी सायंकाळी वादाची ठिणगी पडली आणि दुकानाची तोडफोड करण्यात आली. मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास इनोव्हासह काही दुचाकीवरून आलेल्या अनोळखी हल्लेखोरांनी शिवसेनेचे उपशहरप्रमुख श्रीकृष्ण उर्फ बावा चव्हाण यांच्या दुकानाची तोडफोड करून दुकानात घुसून चव्हाण यांना मारहाण केली. या मारहाणीनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.
या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच शिवसैनिकांनी घटनास्थळी धाव घेतली. शिवसेनेचे आमदार राजन साळवी, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, उपजिल्हाप्रमुख संजय साळवी, उद्योजक किरण सामंत यांच्यासह शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती. दोन पक्षात उफाळलेला वाद अधिक चिघळू नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेत पोलीस बंदोबस्त वाढविला होता.