रत्नागिरी : धक्कादायक ! झपाट्याने कमी होत आहे रत्नागिरीतील वनक्षेत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 01:41 PM2018-03-22T13:41:54+5:302018-03-22T13:41:54+5:30
वनक्षेत्र टिकले पाहिजे, वनसंपदेचे रक्षण झाले पाहिजे, अशी हाकाटी घातली सर्वच स्तरांवरून घातली जात असतानाच रत्नागिरी जिल्ह्यातील वनक्षेत्र मात्र गेल्या दोन वर्षात तब्बल ३० चौरस किलोमीटरने कमी झाल्याची माहिती खरवते - दहीवली येथील पर्यावरण शास्त्राचे प्रा. आशिष अशोक लाड यांनी लोकमतशी बोलताना दिली.
अरुण आडिवरेकर
रत्नागिरी : वनक्षेत्र टिकले पाहिजे, वनसंपदेचे रक्षण झाले पाहिजे, अशी हाकाटी घातली सर्वच स्तरांवरून घातली जात असतानाच रत्नागिरी जिल्ह्यातील वनक्षेत्र मात्र गेल्या दोन वर्षात तब्बल ३० चौरस किलोमीटरने कमी झाल्याची माहिती खरवते - दहीवली येथील पर्यावरण शास्त्राचे प्रा. आशिष अशोक लाड यांनी लोकमतशी बोलताना दिली.
वन परिस्थिती अहवालानुसार सन २०१५मध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे वनक्षेत्र ४१९६ चौरस किलोमीटर इतके होते. हेच क्षेत्र सन २०१७मध्ये ४१६६ चौरस किलोमीटर इतके झाले आहे.
कमी झालेल्या वनांमध्ये मध्यम घनदाट आणि खुल्या वनांचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले. नष्ट होत चाललेले हे वन टिकवण्यासाठी शाश्वत शहरांसाठी वने हे नवे धोरण आखण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
रत्नागिरी जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ८२०८ चौरस किलोमीटर इतके आहे. या क्षेत्रफळामध्ये वनांचा विचार करता अति घनदाट वने, मध्यम घनदाट आणि खुले वन अशा भागात वन क्षेत्र विभागले गेलेले आहे.
मात्र, दिवसेंदिवस हे क्षेत्र कमी होत चालले असून, वृक्षांची तोड करून त्याठिकाणी टोलेजंगी इमारती बांधल्या जात आहेत. वृक्षतोड होत नसल्याचे वन विभागाकडून सांगण्यात येत असले तरी वन व पर्यावरण मंत्रालयाच्या वन परिस्थिती अहवालाच्या आकडेवारीनुसार रत्नागिरीतील वनक्षेत्र कमी होत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील मध्यम घनदाट व खुल्या वनांचे क्षेत्रफळ कमी झाल्याचे दिसून येते. सन २०१५ मध्ये क्षेत्रफळाच्या ५१.१२ टक्के इतके वनक्षेत्र होते. सन २०१७मध्ये ते ५०.७६ टक्के इतके क्षेत्रफळ झाले असल्याचे आशिष लाड यांनी सांगितले.
मात्र, जिल्ह्यातील अतिघनदाट क्षेत्र आजही टिकून असल्याचे दिसून येते. वनांचे कमी होत जाणारे क्षेत्र पाहता आता शाश्वत शहरांसाठी वनेह्ण ही योजना जाहीर केली आहे.
यानुसार ही वनेच शहरांना स्वच्छ, निरोगी आणि आनंदी बनवू शकतील. त्याचबरोबरच इमारतीच्या बाजूला वृक्षांचे आच्छादन असल्यास इमारतीच्या आतील बाजूचे तापमान ८ अंश सेल्सिअसने कमी होते. तेथे वातानुकुलीत यंत्राची आवश्यकता भासणार नाही.
मध्यम व खुले वनक्षेत्रात घट
रत्नागिरी जिल्ह्यातील सन २०१५ आणि सन २०१७चे प्रमाण पाहता अतिघनदाट वनांचे क्षेत्र ३३ चौरस किलोमीटर इतके कायम आहे. सन २०१५मध्ये मध्यम घनदाट क्षेत्र १९०९ चौरस किलोमीटर इतके होते ते १८९२ चौरस किलोमीटर तर खुले वन २२५४ चौरस किलोमीटर इतके होते. हे क्षेत्र आता २२४१ चौरस किलोमीटर झाले आहे.
शाश्वत वने : उपयुक्त आणि सौंदर्यही
शाश्वत शहरातील वने ही वातावरणातील प्रदूषके शोषून घेण्याचे कार्य करतात. शहरी वने ध्वनी प्रदूषणाची तीव्रता कमी करतात. ही वने विविध पशू-पक्षी यांची आश्रयस्थाने असतात. ज्यामुळे जैवविविधतेचे संतुलन साधले जाते. शहरातील वने वृक्षाच्छादन तर वाढवतातच तसेच शहराचे सौंदर्यदेखील वाढवतात.