रत्नागिरी : आडिवरे गावचे सुपुत्र श्रीधर पाध्येंचा ८१व्या वर्षीदेखील तबला वादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 03:36 PM2018-03-06T15:36:27+5:302018-03-06T15:36:27+5:30
राजापूरमधील आडिवरे गावचे सुपुत्र तसेच दिल्ली व अजराडा घराण्याचे अभ्यासक, तबलावादक, तालमहर्षी गुरुवर्य पंडित श्रीधर यशवंत पाध्ये वयाच्या ८१ व्या वर्षात पदार्पण करीत असून, त्यानिमित्त शुक्रवारी (दिनांक ९ मार्च) महाकाली मंदिर, आडिवरे येथे त्यांच्या शिष्यांतर्फे पंडितजींचा सत्कार करण्यात येणार आहे.
रत्नागिरी : राजापूरमधील आडिवरे गावचे सुपुत्र तसेच दिल्ली व अजराडा घराण्याचे अभ्यासक, तबलावादक, तालमहर्षी गुरुवर्य पंडित श्रीधर यशवंत पाध्ये वयाच्या ८१ व्या वर्षात पदार्पण करीत असून, त्यानिमित्त शुक्रवारी (दिनांक ९ मार्च) महाकाली मंदिर, आडिवरे येथे त्यांच्या शिष्यांतर्फे पंडितजींचा सत्कार करण्यात येणार आहे. आज वयाच्या ८१ व्या वर्षात पदार्पण करतानाही पंडित श्रीधर पाध्ये यांचा ज्ञानयज्ञ अव्याहतपणे सुरु आहे.
हा कार्यक्रम शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता सुरू होणार असून, यावेळी पं. पाध्ये यांचे निवडक शिष्य तबलावादन करणार आहेत. यावेळी पंडित राजेंद्र मणेरीकर यांचे शास्त्रीय गायनदेखील होणार आहे. हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी विनामूल्य आहे.
राजापूर तालुक्यातील आडिवरे गावात दिनांक ९ मार्च १९३८ रोजी जन्मलेल्या श्रीधर पाध्ये यांचे आरंभीचे तबल्याचे शिक्षण कै. पं. सखारामपंत भागवत, कशेळी यांचेकडे झाले. कोकणातील पारंपरिक भजनांमधून त्यांच्यावर ताल व लयींचे सूक्ष्म संस्कार झाले. मुंबईला आल्यावर सन १९५७ साली त्यांची पं. यशवंतराव केरकर यांच्याशी भेट झाली व त्यांच्या सांगितिक जीवनाला नवी दिशा प्राप्त झाली.
पं. केरकर हे दिल्ली-अजराडा व पूरब घराण्याच्या ज्ञानाचे महासागर होते. उस्ताद गामे खाँ, उस्ताद हबीबुद्दीन खाँ व उस्ताद आमिर हुसेन खाँ यांच्यासह अनेक गुरुंकडून त्यांनी विधीवत विद्या प्राप्त केली होती. उस्ताद थिरकवा साहेबांचाही सहवास त्यांना लाभला. पं. केरकर यांच्याकडून श्रीधर पाध्ये यांना घराणेदार बंदिशींचा खजिना व निकासाचे मार्गदर्शन मिळाले. आडिवरे येथे या कार्यक्रमाच्यानिमित्ताने त्यांना पाहण्याची संधी येथील ग्रामस्थांना मिळणार आहे.
अखंड गुरूसेवा
सन १९५७पासून १९९२पर्यंत म्हणजेच पं. केरकर यांच्या अखेरपर्यंत पाध्ये यांनी पं. केरकर यांच्याकडून तबल्याचे शिक्षण घेताना अखंड गुरुसेवा केली. सन १९६५ साली पं. श्रीधर पाध्ये यांनी तबला शिकवण्यास सुरुवात केली. कालांतराने त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागात दहा वर्षे अध्यापनाचे कार्य केले.
अग्रक्रमाने नाव
आज देशात हयात असलेल्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ तबला गुरुंमध्ये दिल्ली आणि अजराडा घराण्याचे तबलावादक गुरुवर्य पंडित श्रीधर पाध्ये अर्थात पाध्ये मास्तर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.
बालगंधर्व, हिराबाई बडोदेकर यांनाही साथ
बालगंधर्व व पंडिता हिराबाई बडोदेकर यांचेसोबतही प्रत्येकी एकदा साथ केली. ज्येष्ठ संगीततज्ञ प्रा. बी. आर. देवधर यांच्या संगितावरील व्याख्यानांमध्ये तसेच मैफलींमध्ये पाध्ये यांनी तबला संगत केली. पंडिता धोंडुताई कुलकर्णी यांचेसोबत सतत ४० - ५० वर्षे साथसंगत केली.
नाट्यसंगीताचेही तंत्र अवगत
शास्त्रीय संगीतासोबतच पाध्ये यांना नाट्यसंगीत वाजविण्याचे देखील तंत्र अवगत आहे. शांता आपटे यांच्या एकपात्री ह्यस्वयंवरह्ण नाटकाला त्यांनी संगत केली. अनेक वर्षे त्यांनी सुहासिनी मूळगांवकर यांच्या नाटकांच्या प्रयोगात तबल्याची संगत केली. महत्त्वाचे म्हणजे श्रीधर पाध्ये यांना भजन, चक्रीभजन, साखी, दिंडी व कीर्तन या पारंपरिक लोकसंगीत प्रकारांमध्ये देखील समर्पक तबलासाथ करण्याचे तंत्र अवगत आहे.
जोहान्सबर्गमध्येदेखील प्रात्यक्षिक वर्ग
सन १९९३ साली पं. श्रीधर पाध्ये दक्षिण आफ्रिकेतील दर्बन विद्यापीठाच्या निमंत्रणावरुन तेथील संगीत विभागात अतिथी प्राध्यापक म्हणून गेले होते. त्यावेळी जोहान्सबर्ग येथील लेनेशिया स्कूल फॉर म्युझिक येथे देखील त्यांनी चार महिने तबल्याचे प्रात्यक्षिक वर्ग घेतले. त्यापूर्वी द. आफ्रिकेतील १०-१५ विद्यार्थी मुंबईत १-२ वर्षे राहून त्यांचेकडून तबला शिक्षण घेऊन गेले.