रत्नागिरी : तीन दिवसांत तीन हजार डझन हापूसची लक्षणीय विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 05:07 PM2018-06-02T17:07:03+5:302018-06-02T17:11:32+5:30
रत्नागिरी हापूसला औरंगाबादकरांची विशेष पसंती मिळाल्याने शुक्रवारी महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी तब्बल एक हजार डझन आणि एकूण तीन हजार डझन आंब्यांची लक्षणीय विक्री झाली. त्याचबरोबर पुढील वर्षीपासून दरवर्षी होणाऱ्या या महोत्सवासाठी आग्रहाचे निमंत्रणही मिळाले आहे.
शोभना कांबळे
रत्नागिरी : रत्नागिरी हापूसला औरंगाबादकरांची विशेष पसंती मिळाल्याने शुक्रवारी महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी तब्बल एक हजार डझन आणि एकूण तीन हजार डझन आंब्यांची लक्षणीय विक्री झाली. त्याचबरोबर पुढील वर्षीपासून दरवर्षी होणाऱ्या या महोत्सवासाठी आग्रहाचे निमंत्रणही मिळाले आहे.
शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा, या संकल्पनेतून राज्य कृषी पणन मंडळ व कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने औरगांबाद येथे ३०, ३१ मे आणि १ जून या तीन दिवसांच्या कालावधीत आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील १३ आंबा उत्पादक सहभागी झाले होते.
रत्नागिरी बाजार समितीचे सभापती मधुकर दळवी, समितीचे सहाय्यक सचिव सुहास साळवी, सुधाकर कोकीतकर, निरीक्षक अतुल नागवेकर, लिपीक रूपेश दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली नीलेश चव्हाण, निवळी, मारूती साळुंखे, करबुडे, दिगंबर मयेकर, पोमेंडी, सुभाष भुवड, डुगवे, गणेश देसाई, दीपक देसाई, नूरमहंमद मुकादम, अर्जुन पाडावे आणि प्रकाश साळवी यांनी आंब्याची विक्री केली.
तीन दिवसांच्या कालावधीत झालेल्या या महोत्सवात नैसर्गिक पिकवलेला रत्नागिरी हापूस उपलब्ध झाल्याने रत्नागिरीच्या हापूसची लक्षणीय उचल झाली. या तीन दिवसात हापूसला उत्तम दर मिळालाच पण तब्बल तीन हजार डझन आंब्याची विक्री झाल्याने आंबा उत्पादकही आनंदी झाले असून, पुढीलवर्षी पुन्हा सहभागी होण्याचे ठरवले आहे.
आग्रहाचे निमंत्रण
रत्नागिरी हापूसला या महोत्सवात चांगली पसंती मिळाली आहे. त्यामुळे याठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने पुढील वर्षी होणाऱ्या महोत्सवासाठी आग्रहाने बोलावले असल्याचे रत्नागिरी बाजार समितीचे सभापती मधुकर दळवी यांनी माहिती देताना सांगितले.