रत्नागिरी : विद्यार्थी मारहाणप्रकरणी सेंट थॉमस स्कूलच्या समर्थनार्थ पालकांचा मूक मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 05:01 PM2018-10-27T17:01:59+5:302018-10-27T17:03:23+5:30
शैक्षणिक संस्थेत होणाऱ्या अरेरावीला विरोध करण्यासाठी शहरानजिकच्या कारवांची वाडी येथील सेंट थॉमस स्कूल मधील विद्यार्थ्यांचे पालक तसेच अन्य शाळेच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आज सकाळी मारूती मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढून अशा घटनांबाबत निषेध व्यक्त केला. यात तीनशेहून अधिक पालक सहभागी झाले होते.
रत्नागिरी : शैक्षणिक संस्थेत होणाऱ्या अरेरावीला विरोध करण्यासाठी शहरानजिकच्या कारवांची वाडी येथील सेंट थॉमस स्कूल मधील विद्यार्थ्यांचे पालक तसेच अन्य शाळेच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आज सकाळी मारूती मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढून अशा घटनांबाबत निषेध व्यक्त केला. यात तीनशेहून अधिक पालक सहभागी झाले होते.
शहरानजिकच्या कुवारबाव येथील सेंट थॉमस इंग्लिश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थी निहार दिलीप मांगले या विद्यार्थ्याला मुख्याध्यापकांनी मारहाण केल्याचा आरोप करीत त्याचा जाब विचारण्यासाठी काही संस्थांचे कार्यकर्ते व पालक हे या शाळेत जाऊ थडकले. यापैकी काहींनी या शाळेचे प्राचार्य व इतर शिक्षकांना धक्काबुक्की करत, शिविगाळ करून धमकी दिल्याची तक्रार या शाळेतीलच काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे.
शाळांमध्ये होणाऱ्या या अरेरावीच्या घटनांना पायबंद होण्यासाठी या शाळेच्या काही विद्यार्थ्यांचे पालक यांनी आवाहन केल्यानुसार इतरही शाळांमधील विद्यार्थ्यांचे पालक मिळून सुमारे ३०० पेक्षा अधिक पालकांनी एकत्रित आज सकाळी मूक मोर्चा काढला.
या मूक मोर्चाला मारुती मंदिर येथून सुरूवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारापाशी या मोर्चाची सांगता झाली. शाळांमध्ये होणाऱ्या या गैरप्रकारांना आळा बसावा, अशा मागणीचे निवेदन यावेळी जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. सामान्य प्रशासन विभागाचे नायब तहसीलदार विजय दांडेकर यांनी हे निवेदन स्वीकारले.
शाळांमध्ये असे प्रकार घडले तर तिथले शिक्षक भीतीच्या छायेखाली काम करतील. त्यामुळे शिक्षणाचा दर्जाही घसरेल, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शिक्षकांना धमकी व शिवीगाळ केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी सहा जणांवर कारवाई केली आहे. याबरोबरच सोशल नेटवर्क वरून भावना भडकवणाºयांची देखील चौकशी व्हावी, अशी मागणी यावेळी या पालकांकडून करण्यात आली.