रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रशासनाकडे ४ हजार ५१९ शस्त्रे जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 10:34 AM2019-04-09T10:34:34+5:302019-04-09T10:36:55+5:30
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आत्तापर्यंत १६५ ठिकाणी टाकलेल्या छाप्यात एकूण ४८,३९१ लिटर अवैध दारू जप्त करण्यात आली असून
रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आत्तापर्यंत १६५ ठिकाणी टाकलेल्या छाप्यात एकूण ४८,३९१ लिटर अवैध दारू जप्त करण्यात आली असून त्याची किंमत ४३,५७,९७१ रूपये एवढी आहे. त्याचबरोबर आत्तापर्यंत ४५१९ शस्त्रे ताब्यात घेण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
निवडणुकीच्या अनुषंगाने माहिती देण्याकरिता जिल्हाधिकारी चव्हाण यांनी ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर उपस्थित होते.
येत्या दोन दिवसांत अंतिम पुरवणी यादी प्रसिद्ध होणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. रत्नागिरी - सिंधुदुर्ग या मतदार संघासाठी एकूण १९४२ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून त्यासाठी ८५४४ कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. यात प्रत्येक केंद्रावर केंद्राध्यक्ष आणि अन्य तीन अशा चार अधिकाºयांचा समावेश असेल.
निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून ७ एप्रिल पर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात ११० ठिकाणी छापे टाकण्यात आले असून २७ लाख ४ हजार ७८४ रूपयांची ४०,१५४ लिटर्स दारू जप्त करण्यात आली आहे. तर सिंधुदुर्गमध्ये ५५ ठिकाणी छापे टाकण्यात आले असून १४ लाख ३२ हजार ७४२ रूपयांची ७,१३४ लिटर्स दारू जप्त करण्यात आली आहे. रत्नागिरीत २५६४ शस्त्रे तर सिंधुदुर्गात १९५५ शस्त्रे अशी एकूण ४५१९ शस्त्रे खबरदारीचा उपाय म्हणून ताब्यात घेण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. निवडणुकीच्या काळात सर्वच बाबींवर बारीक लक्ष राहणार असल्याचे सांगण्यात आले.
९ तक्रारी दाखल
आत्तापर्यंत सी व्हीजिल वरून एकूण ९ तक्रारी दाखल झाल्या आहेत. आचारसंहितेच्या अनुषंगाने असलेल्या तक्रारींची निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार गंभीर दखल घेतली जाणार असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
टपाली मतदान ४,८८७ अर्ज प्राप्त
रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदार संघातील सैनिक मतदारांची संख्या १०५२ इतकी आहे. एकूण टपाली मतदान १६,१३२ इतके असून त्यापैकी आत्तापर्यंत ४,८८७ अर्ज प्राप्त झाले आहेत. १६ एप्रिलपर्यंत टपाली मतदानाचे अर्ज घेणार आहेत.
जाहिरात प्रमाणित करणे बंधनकारक
प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर शेवटच्या ४८ तासात कोणतीही जाहिरात वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाची असल्यास प्रसारमाध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीकडून प्रमाणित करून घेणे बधंनकारक आहे.