रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा : भाजपाच्या बैठकीमध्ये विनायक राऊत यांना विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 01:25 PM2019-03-13T13:25:46+5:302019-03-13T13:30:13+5:30

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सेनेचे खासदार विनायक राऊत यांना सहकार्य करायचे नाही, अशी विरोधाची भूमिका सिंधुदुर्ग भाजपाप्रमाणेच रत्नागिरी भाजपा कार्यकर्त्यांनीही मंगळवारी येथील बैठकीत घेतली. भाजपाच्या या राजकीय गुगलीने शिवसेना मात्र घायाळ झाली आहे. याबाबत कोणतीही प्रतिक्रीया न देता शिवसेना नेत्यांनी सबुरीचे धोरण घेतले आहे.

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha: Opposition to Vinayak Raut in the BJP meeting | रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा : भाजपाच्या बैठकीमध्ये विनायक राऊत यांना विरोध

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा : भाजपाच्या बैठकीमध्ये विनायक राऊत यांना विरोध

Next
ठळक मुद्देप्रचारात सेना करणार मोदी, शहा, फडणवीस यांचे अभिनंदनभाजपाच्या राजकीय गुगलीने शिवसेना घायाळ

प्रकाश वराडकर

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सेनेचे खासदार विनायक राऊत यांना सहकार्य करायचे नाही, अशी विरोधाची भूमिका सिंधुदुर्ग भाजपाप्रमाणेच रत्नागिरी भाजपा कार्यकर्त्यांनीही येथील बैठकीत घेतली. भाजपाच्या या राजकीय गुगलीने शिवसेना मात्र घायाळ झाली आहे. याबाबत कोणतीही प्रतिक्रीया न देता शिवसेना नेत्यांनी सबुरीचे धोरण घेतले आहे.

रत्नागिरीतील देवर्षीनगर येथे जिल्हा भाजपा कार्यकारिणी, पदाधिकारी, तालुकाध्यक्ष व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यावेळी भाजपाचे लोकसभा मतदारसंघ प्रभारी आमदार प्रसाद लाड, जिल्हाध्यक्ष बाळ माने, अशोक मयेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी तालुकाध्यक्ष, कार्यकर्ते यांनी गेल्या साडेचार वर्षात खासदार राऊत यांच्याकडून पक्षाला मिळालेल्या सापत्न भावाच्या वागणूकीबाबत तक्रार केली. एकवेळ दुसऱ्या समविचारी पक्षाला मदत करू मात्र जिल्ह्यांमधील भाजपामध्ये शिवसेनेला मदत करण्याची मानसिकताच उरलेली नाही. सेनेचे विनायक राऊत यांना असलेला तीव्र विरोध पाहता नेत्यांची व कार्यकर्त्यांची समजूत काढणे भाजपा नेते आमदार प्रसाद लाड व पदाधिकाऱ्यांना अवघड गेले. कणकवलीतील सिंधुदुर्ग जिल्हा बैठकीतही भाजपा कार्यकर्त्यांच्या रोषाला पदाधिकाऱ्यांना सामोरे जावे लागले होते.

राज्यात व देशात सेना व भाजपा युती झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शाहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समविचारी पक्षांच्या मतांचे विभाजन होऊ नये, केंद्रात पुन्हा सत्ता स्थापन व्हावी, देशहित जपले जावे, यासाठीच युती केली आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांमधील भाजपा नेते व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांशी बैठक होण्याआधी कोणतीच कृती करू नये, असे प्रसाद लाड यांनी सांगितले.

भाजपाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनीही शिवसेनेला या मतदारसंघात का मदत करावी, असा प्रश्न केला. आम्ही युतीचा धर्म पाळू पण टाळी एका हाताने वाजत नाही, असे ते म्हणाले. गेल्या साडेचार वर्षांमध्ये युतीचा खासदार म्हणून राऊत यांनी भाजपाला किती सन्मान दिला? आम्ही रत्नागिरी शहरासाठी पाणी योजना आणली त्याचे काम अजून का झालेले नाही, असा सवालही त्यांनी केला.
 

Web Title: Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha: Opposition to Vinayak Raut in the BJP meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.