रत्नागिरी, सिंधुदुर्गात आजपासून चित्रपट महोत्सव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 12:06 PM2023-12-11T12:06:25+5:302023-12-11T12:06:46+5:30
रत्नागिरी : कोकणातील रोजगार निर्मितीसाठी कलाकार, नागरिक आणि शासन व्यवस्था एकत्र येऊन चळवळ उभी राहण्यासाठी सिंधुरत्न कलावंत मंचातर्फे काेकण ...
रत्नागिरी : कोकणातील रोजगार निर्मितीसाठी कलाकार, नागरिक आणि शासन व्यवस्था एकत्र येऊन चळवळ उभी राहण्यासाठी सिंधुरत्न कलावंत मंचातर्फे काेकण चित्रपट महाेत्सवाचे आयाेजन करण्यात आले आहे. हा महाेत्सव ११ ते १६ डिसेंबर या कालावधीत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हाेणार आहे. दि. १६ डिसेंबर राेजी मालवण येथे पारिताेषिक वितरण साेहळा हाेणार आहे.
सिंधुरत्न कलावंत मंचाचे अध्यक्ष ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर आणि रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने या महाेत्सवाचे आयाेजन करण्यात आले आहे. या महाेत्सवांतर्गत दि. ११ डिसेंबर राेजी दुपारी दाेन वाजता ग्रंथालय ते राधाबाई शेट्ये सभागृह शोभायात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी २:३० वाजता गाेगटे जाेगळेकर महाविद्यालयात उद्घाटन समारंभ हाेणार आहे. या समारंभाचे सूत्रसंचालन महाेत्सवाचे समन्वयक डाॅ. आनंद आंबेकर करणार असून, स्वागत, प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी आणि प्रस्तावना विजय पाटकर करणार आहेत.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरी एज्युकेशन साेसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, सिंधुरत्न कलावंत मंचाचे कार्यवाह विजय राणे, सहकार्यवाह प्रकाश जाधव उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर परिसंवाद हाेणार असून, त्यामध्ये विजय पाटकर आणि विजय राणे सहभागी हाेणार आहेत.
दिनांक १२ राेजी सकाळी ११ वाजता भारत शिक्षण मंडळाच्या डी. जे. के. महाविद्यालयाच्या इंटरॅक्टिव्ह सभागृहात चित्रपट स्क्रिनिंग हाेणार आहे. दिनांक १३ व १४ राेजी सकाळी ११ वाजता गाेगटे जाेगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई सभागृहात चित्रपट स्क्रिनिंग, दिनांक १५ राेजी सकाळी ११ वाजता भारत शिक्षण मंडळाच्या डी. जे. के. महाविद्यालयात चित्रपट स्क्रिनिंग हाेणार आहे. त्यानंतर रत्नागिरीतील महाेत्सवाचा भारत शिक्षण मंडळाच्या डी. जे. के. महाविद्यालयात समारोप समारंभ हाेणार आहे.