रत्नागिरी : इनामपांगारीची सुवर्णकन्या सोनाली गावडेचे गरिबीमुळे स्वप्न अधुरे; उमेद कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:42 PM2018-03-10T12:42:19+5:302018-03-10T12:43:05+5:30
इनामपांगारी या छोट्या गावात जन्माला आलेल्या सोनाली गावडे ही सुवर्णकन्या शालेय जीवनापासूनच धावणे या क्रीडा प्रकारात पारंगत होती. पायका क्रीडा स्पर्धेअंतर्गत धावण्याच्या स्पर्धेत अनेक सुवर्णपदकांची कमाई करत तिने चेन्नई येथील नॅशनल स्पर्धेत रौप्यपदक मिळवले होते.
शिवाजी गोरे
दापोली : इनामपांगारी या छोट्या गावात जन्माला आलेल्या सोनाली गावडे ही सुवर्णकन्या शालेय जीवनापासूनच धावणे या क्रीडा प्रकारात पारंगत होती. पायका क्रीडा स्पर्धेअंतर्गत धावण्याच्या स्पर्धेत अनेक सुवर्णपदकांची कमाई करत तिने चेन्नई येथील नॅशनल स्पर्धेत रौप्यपदक मिळवले होते.
ग्रामीण भागातून सुवर्णपदक मिळवणारी पहिली मुलगी बनण्याचा मान तिला मिळाला होता. देशाची मान अभिमानाने उंचावण्याचा तिचा प्रयत्न होता. मात्र, कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे क्षमता असतानाही केवळ आर्थिक पाठबळ नसल्याने देशासाठी आपण खेळू शकत नसल्याची खंत तिच्या मनात आहे.
कुटुंबात अठराविश्व दारिद्र्य पाचवीला पूजलेले. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची. अशातच तिच्या जन्माअगोदरच वडिलांचे छत्र हरपले. वडिलांनंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी आई सुवर्णा गावडे यांच्यावर आली.
मोलमजुरी करून आईने चारही मुलांचे संगोपन केले. वडिलांची उणीव भासू दिली नाही. सगळ्यात छोटी मुलगी सुवर्णा गावडे हिने आईच्या कष्टाचे सोने केले.
चेन्नई येथील राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक मिळवल्यानंतर यापुढे आपण देशासाठी खेळावे, अशी तिची इच्छा होती. परंतु कुटुंबाची गरिबी व आईची मेहनत तिला पाहावत नव्हती. म्हणून तिने खेळाचा डाव अर्ध्यावर सोडून नोकरी करण्याचा निर्णय घेतला. आज ती मंडणगड पोलीस स्थानकात कार्यरत आहे.
पुन्हा खेळाकडे लक्ष द्यायचे आहे.
देशासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव मिळवायचे होते. परंतु वडिलांच्या निधनानंतर आईने खूप कष्ट केले. इनामपांगारी मराठी शाळेचे तत्कालीन मुख्यध्यापक खांडेकर गुरुजी व वि. रा. घोले हायस्कूलचे क्रीडाशिक्षक अनिल कुंभार यांनी उत्तम मार्गदर्शन केले आणि आर्थिक मदतही केली. त्यामुळेच मी नॅशनलपर्यंत पोहोचू शकले. पुन्हा खेळाकडे लक्ष द्यायचे असून, अजून उमेद कायम आहे.
- सोनाली गावडे
तिला पुढे खूप धावायचे होते
पतीचे अपघाती निधन झाले तेव्हा माझ्या पायाखालची वाळूच सरकली. तीन लहान मुलं, सोनाली ७ महिन्यांची पोटात होती. मुलांना खूप शिकवून मोठं करण्याचं पतीचं स्वप्न होत. त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याची व मुलांचं संगोपन करण्याची मुख्य जबाबदारी माझ्यावर होती. शिक्षकांनी केलेली मदत व कष्ठाने सोनालीने अनेक स्पर्धा जिंकल्या. तिला पुढे खूप धावायचे होते. मात्र, कुटुंबाच्या गरिबीमुळे तिला खेळ अर्धवट सोडावा लागला याचे दु:ख आहे.
- सुवर्णा गावड