रत्नागिरी : सागरी महामार्गाचे लवकरच दुपदरीकरण, प्रकल्प आराखडा केंद्र शासनाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 03:24 PM2018-09-27T15:24:06+5:302018-09-27T15:27:26+5:30
करंजा ते आरोंदा या ५५० किलोमीटर लांबीच्या सागरी महामार्ग दुपदरीकरणासाठी राज्य शासनाकडून २५०० कोटींचा प्रकल्प आराखडा (डीपीआर) केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.
रत्नागिरी : करंजा ते आरोंदा या ५५० किलोमीटर लांबीच्या सागरी महामार्ग दुपदरीकरणासाठी राज्य शासनाकडून २५०० कोटींचा प्रकल्प आराखडा (डीपीआर) केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.
सध्याचा अनेक तुकड्यांच्या स्वरुपातील सागरी महामार्ग सलग जोडण्यासाठी त्याची नव्याने बांधणी होणार आहे. या जोडणीत ८२ पूल उभारले जाणार आहेत. या प्रकल्पासाठी शासनस्तरावरून ड्रोन कॅमेऱ्याद्वारे सर्वेक्षणाचे कामही पूर्ण झाले आहे.
येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार करंजा ते रेवस - दिघी - जैतापूर - वेंगुर्ला - आरोंदा असा हा ५५० किलोमीटर लांबीचा सागरी महामार्ग आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सागरी महामार्गाचे काम सुरू होते. मात्र, अनेक ठिकाणी नद्या असून, त्यावर पूल न उभारता जेटी उभारून फेरीबोटीच्या सहाय्याने वाहनांना पुढील मार्गावर जावे लागते.
त्यामुळे हा प्रवास अडथळ्यांचा ठरत आहे. अनेकदा फेरीबोटीबाबतच्या समस्यांमुळेही सागरी महामार्गावरील वाहतूक बेभरवशी ठरत आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठीच सर्व पुलांसहीत हा सागरी महामार्ग तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
कोकणात वाढणाऱ्या सागरी पर्यटनासाठीही सागरी महामार्ग सलगपणे होणे आवश्यक आहे. त्यासाठीच केंद्र शासन स्तरावरून सागरी महामार्ग पहिल्या टप्प्यात नव्याने बांधणी करीत दुपदरी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
करंजा ते आरोंदा किरणपाणी या गोव्याच्या हद्दीपर्यंतचा सागरी महामार्ग कोकणातील पर्यटन विकासासाठीच उभारण्यात आला होता. मात्र अनेक ठिकाणी हा महामार्ग अपुरा तसेच तुकड्यांच्या स्वरुपात आहे. सागरी महामार्गाच्या झालेल्या कामाच्या दर्जाबाबतही अनेकांचे आक्षेप आहेत. आता या महामार्गाची पुनर्बांधणी व दुपदरीकरणासाठी केंद्राने पुढाकार घेतला आहे.
करंजा ते आरोंदा या संपूर्ण सागरी महामार्गावर ८२ पुल होणार असून त्यातील १८ पुल रत्नागिरी जिल्ह्यात व १० पुल सिंधुदुर्गात होणार आहेत. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जात असलेल्या या सागरी महामार्गाच्या उभारणीसाठी ३ एजन्सींचीही नेमणूक केली आहे. ड्रोन कॅमेºयाद्वारे सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले.