निधीअभावी रत्नागिरीतील क्रीडा संकुलाचे काम रखडले, अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे ओढाताण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 04:10 PM2018-08-29T16:10:56+5:302018-08-29T16:14:54+5:30
सर्व सोयीसुविधांनी युक्त असे रत्नागिरीतील एमआयडीसी येथे क्रीडा संकुल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ५ कोटींच्या या क्रीडा संकुलाला आवश्यक असणारा निधी कमी पडल्याने संथ गतीने काम सुरू आहे. निधीची उपलब्धता झाल्यास हे काम वेगाने सुरू होऊन दोन ते अडीच वर्षात हे संकुल उभे राहील, अशी आशा आहे.
रत्नागिरी : सर्व सोयीसुविधांनी युक्त असे रत्नागिरीतील एमआयडीसी येथे क्रीडा संकुल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ५ कोटींच्या या क्रीडा संकुलाला आवश्यक असणारा निधी कमी पडल्याने संथ गतीने काम सुरू आहे. निधीची उपलब्धता झाल्यास हे काम वेगाने सुरू होऊन दोन ते अडीच वर्षात हे संकुल उभे राहील, अशी आशा आहे.
रत्नागिरीसारख्या जिल्ह्यात कमी साधनसुविधा असतानाही या जिल्ह्याने चांगले खेळाडू दिले आहेत. संपदा धोपटकर, प्रियदर्शनी जागुष्टे, ऐश्वर्या सावंत, रियाज अली यांसारख्या खेळाडूंनी शिवछत्रपती पुरस्कार पटकावून खेळातील जिल्ह्याचे स्थान अधिक पक्के केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आशियाई, राष्ट्रकुल व जागतिक अजिंक्य स्पर्धांमध्ये खेळाडूंनी आपल्या खेळाचा ठसा उमटवून जिल्ह्याला खेळामध्ये मानाचे स्थान मिळवून दिले आहे.
रत्नागिरीतील खेळाडंूसाठी दर्जेदार क्रीडा संकुल उपलब्ध होण्यासाठी एमआयडीसी येथे ११.५० एकर जागेत क्रीडा संकुल उभारण्यात येत आहे. या संकुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. ५ कोटी रूपये खर्च करून हे क्रीडा संकुल बांधण्यात येत आहे.
सध्या याठिकाणी कार्यालय, चेंजिंग रूम्स, वसतिगृह असे एकूण ४ कोटी १६ लाखाचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित निधी उपलब्ध झाल्यानंतर शिल्लक कामाला सुरूवात करण्यात येणार आहे. याठिकाणी सिंथेटिक ट्रॅक, बहुउद्देशीय हॉल बांधण्यासाठी केंद्र शासनाच्या योजनांतर्गत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. निधी नसल्याने हे काम संथगतीने सुरू आहे.
एकीकडे क्रीडा संकुलाचे काम सुरू असतानाच खेळाडूंना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांबाबतही उदासीनता असल्याचे दिसत आहे. अनेक शाळांमध्ये मुलांना खेळण्यासाठी मैदानच नसल्याची विदारक स्थिती आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना खेळाचा सराव करताना अडचणी येत आहेत. ग्रामीण भागात खेळासाठी भातशेतीच्या जमिनीचा वापर करावा लागतो.
प्रसाधनगृहाची दुरवस्था
रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे असणाऱ्या प्रसाधनगृहाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. याठिकाणी येणाऱ्या महिला खेळाडूंची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. गतवर्षी येथील क्रीडा संकुलातील दुरवस्थेबाबत तत्कालिन क्रीडामंत्री उदय सामंत यांनी कानउघाडणी केली होती. त्यानंतर बाहेर मॅट टाकण्यात आले होते. सध्या याठिकाणी असणाऱ्या प्रसाधनगृहाच्या काचा तुटलेल्या आहेत, नळाचे पाईप तुटलेले आहेत, प्रसाधनगृहाचे दरवाजे खराब झाले आहेत. त्यामुळे महिला खेळाडूंची गैरसोय होत आहे.
मॅट आवश्यक
इनडोअर खेळासाठी मॅट आवश्यक असते. मात्र, रत्नागिरीत बॅडमिंटनव्यतिरिक्त अन्य कोणत्याच खेळासाठी मॅट उपलब्ध नसल्याचे विदारक चित्र आहे. त्यामुळे तायक्वाँदो, कराटे, ज्युदो या क्रीडा प्रकारातील खेळाडूंना त्रास सहन करावा लागत आहे. बॅडमिंटनप्रमाणे इतरही खेळाडूंना मॅट उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
रत्नागिरीतील खेळाडूंना चांगल्या सुविधा पुरविण्यात येत आहेत. चांगले खेळाडू घडविण्यासाठी शासनस्तरावरून मिळणाऱ्या योजनांचाही लाभ देण्यात येत आहे. जिल्हा क्रीडा कार्यालयासाठी ८ जागा मंजूर आहेत. सद्यस्थितीत तालुका क्रीडा अधिकारी वर्ग-३ चा एकच कर्मचारी कार्यरत आहे, तर अन्य एक कर्मचारी सप्टेंबरमध्ये सेवानिवृत्त होणार आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे ओढाताण होत आहे. ही रिक्त पदे भरण्यात आली असती तर याहीपेक्षा दर्जेदार सेवा पुरवता आली असती.
- मिलिंद दीक्षित
जिल्हा क्रीडा अधिकारी, रत्नागिरी.