रत्नागिरी : शून्यातून सुरु झालेला व्यवसाय, पशुसंवर्धनात भरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 02:22 PM2018-04-30T14:22:28+5:302018-04-30T14:22:28+5:30
मजुरी करत असतानाच पैसे साठवून शांताराम भागोजी झोरे यांनी एक म्हैस विकत घेतली व त्यावर दुग्ध व्यवसाय सुरू केला. त्यांच्या अविरत मेहनत व कष्टाचे चीज म्हणूनच आता त्यांच्या गोठ्यात ३५ जनावरे असून, दररोज आपल्याकडील ६० लीटर दुधाची विक्री ते गणपतीपळे, वरवडे परिसरात करतात.
मेहरून नाकाडे
रत्नागिरी : मजुरी करत असतानाच पैसे साठवून शांताराम भागोजी झोरे यांनी एक म्हैस विकत घेतली व त्यावर दुग्ध व्यवसाय सुरू केला. त्यांच्या अविरत मेहनत व कष्टाचे चीज म्हणूनच आता त्यांच्या गोठ्यात ३५ जनावरे असून, दररोज आपल्याकडील ६० लीटर दुधाची विक्री ते गणपतीपुळे , वरवडे परिसरात करतात.
मूळ संगमेश्वर येथील असलेल्या शांताराम झोरे यांच्या या कष्टांची दखल शासनानेदेखील घेतली असून, उत्कृष्ट व्यावसायिक म्हणून जिल्हा कृषी, पशुपक्षी महोत्सवात झोरे यांना गौरविण्यात आले आहे.
शांताराम झोरे हे पंधरा वर्षांपूर्वी गडीकामासाठी गणपतीपुळ्यात आले. पाच वर्षे त्यांनी गडीकाम केले. या कामातून काही पैसे साठवले. या साठवलेल्या पैशातून त्यांनी एक म्हैस विकत घेतली. यासाठी त्यांनी गणपतीपुळे येथे भाड्याने जागा घेत दुग्धव्यवसाय सुरू केला.
पैसे जमतील तसे एकेक जनावर त्यांनी वाढवत नेले. त्यामुळे त्यांच्या गोठ्यात आज एकूण ३५ गायी, म्हशी व छोटी बछडी आहेत. गावरान गायी, म्हशीबरोबर जर्सी म्हैस, मुऱ्ह जातीच्या चार गायी त्यांच्याकडे आहेत. दररोज ६० लीटर दूध ते गणपतीपुळे व वरवडे परिसरात विकतात. दुधाबरोबरच त्यांचा दह्याची व्यवसायही चांगला चालतो.
सुरूवातीला गणपतीपुळे गावात भाड्याच्या जागेत त्यांनी गोठा उभारला. मात्र, जनावरांची संख्या वाढल्यामुळे त्यानंतर गणपतीपुळे माळावर विस्तीर्ण असा गोठा उभारला. त्याचठिकाणी शेजारी असलेल्या घरात त्यांनी भाड्याने खोली घेतली आहे.
जनावरांसाठी लागणारी वैरण व दिवसाला १५०० लीटर पाणी ते विकत घेतात. शांताराम यांचा सूर्यादय पहाटे ४ वाजल्यापासून सुरू होतो तर सूर्यास्त रात्री साडेअकरा ते १२ वाजता होतो. या व्यवसायात त्यांना पत्नी व त्यांच्या चार मुलांची मोठी मदत होते.
आपल्या व्यवसायाविषयी झोरे सांगतात की, मजुरी करीत असतानाच ठरवले होते की स्वत:चा दूग्धव्यवसाय वृध्दिंगत करायचा. मात्र, बँका आमच्यासारख्या गरिबांना कर्जासाठी उभे करीत नाहीत. त्यांना लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता आम्ही करू शकत नाही. त्यामुळे कष्टाने वाचवलेल्या पैशातून एकेक जनावर वाढवले. इतकेच नव्हे तर आता २५ गुंठे जागा खरेदी केली असून, तिथे बंदिस्त गोठा बांधला आहे.
या गोठ्याचे बांधकाम पूर्णत्वाच्या मार्गावर असून, पावसाळ्यापूर्वी या स्वमालकीच्या गोठ्यात आम्ही स्थलांतर करणार आहोत. त्याचठिकाणी स्वत:साठी एक छोटे घरदेखील बांधले आहे. सध्या पाणी विकत घ्यावे लागत असल्यामुळे नवीन जागेठिकाणी बोअरवेल खोदली आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.
त्यांचा मोठा मुलगा बारावी करून आयटीआय उत्तीर्ण झाला असून, त्याला मुंबईत महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीत नोकरी मिळाली आहे. मुलीनेदेखील बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असून, अन्य दोन मुलांचेही शिक्षण सुरू आहे. दरम्यान, पत्नीची व मुलांची मला या व्यवसायात चांगली मदत होते.
मजुरीच्या शोधासाठी आलो होतो...
मजुरीच्या शोधार्थ गणपतीपुळेत आलो. परंतु, गणपतीच्या कृपेने स्वत:चा व्यवसाय सुरू केला असून, त्यामध्ये वृध्दीही झाली आहे. लवकरच मी माझ्या हक्काच्या घरात व माझी जनावरेदेखील हक्काच्या गोठ्यात जाणार आहेत. सुरूवातीला पायी दूध घालायला जात असे. त्यानंतर सायकल घेतली. परंतु, आता स्कूटर घेतली असून, स्कूटरवरून दूध घालणे सोपे झाले आहे.
स्कूटरवर किटल्या अडकवून दूध घालणे सोयीस्कर पडते. यामुळे वेळ वाचतो. पहाटे गोठा झाडून दूध काढल्यानंतर मी दूध घालायला जातो. त्यानंतरची गोठा स्वच्छ धुऊन काढणे, गुरांना वैरण घालणे, पाणी देणे, वासरांना बांधणे यासारखी सर्व कामे माझी पत्नी व मुले उरकतात. त्यामुळे दिवसभरात अन्य कामे करता येतात.
पुन्हा सायंकाळी दूध काढणे, घालणे करेपर्यंत जनावरांचे खाद्य वगैरे अन्य कामे घरची मंडळीच करतात. एकूणच झोरे कुटुंबियांनी वटवृक्ष फुलवला आहे. कोणतेही काम छोटे नसते. कष्टाचे फळ नक्कीच मिळते. व्यवसाय वाढवताना पोटाला चिमटा काढला. परंतु, कोणतेही कर्ज न घेता, तो फुलवला याचेच समाधान झोरे यांना आहे. आपली मुले उच्चशिक्षित होतील, यावर त्यांचा विश्वास आहे.