रत्नागिरी थांबली...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:23 AM2021-06-04T04:23:44+5:302021-06-04T04:23:44+5:30
रत्नागिरी : सर्वच्या सर्व दुकाने बंद, रस्ते सुनसान, गाड्यांचा गोंगाट नाही, माणसांच्या हालचाली नाहीत. वर्दळ होती ती फक्त पोलिसांची. ...
रत्नागिरी : सर्वच्या सर्व दुकाने बंद, रस्ते सुनसान, गाड्यांचा गोंगाट नाही, माणसांच्या हालचाली नाहीत. वर्दळ होती ती फक्त पोलिसांची. कडक लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यात सर्वच ठिकाणी हे चित्र दिसत होते. कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या वाढीमुळे जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या कडक लाॅकडाऊनला लोकांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे दिवसभर सर्वत्र शुकशुकाट होता. बंदोबस्तासाठी पोलीस व पोलीसमित्र तैनात होते. त्यामुळे नेहमीची वर्दळ थांबली होती.
जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला व्यापारी, जनतेतून सकारात्मक प्रतिसाद लाभल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची विक्रीसुध्दा थांबविण्यात आली आहे. सकाळी दूध विक्रेत्यांव्यतिरिक्त शहरात सर्वत्र शांतता होती. नेहमी माॅर्निंग वाॅकसाठी बाहेर पडणारे नागरिकही रस्त्यावर नव्हते. एखादेच वाहन रस्त्याने धावताना दिसत होते. ‘अत्यावश्यक सेवे’तील कर्मचारी, अधिकाऱ्यांना कामाच्या ठिकाणी जावे लागत असल्याने तेवढीच ये-जा सुरू होती. पोलीस रस्त्यावर येणारे प्रत्येक वाहन थांबवून चाैकशी करत होते. शहरात ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांचे लसीकरण सुरू असल्याने लसीकरणासाठी जाणाऱ्यांचीही चाैकशी करण्यात येत होती. लसीकरणाबाबतचा संदेश पाहिल्याखेरीज त्यांना सोडले जात नव्हते.
शहरातील परटवणे, मारुती मंदिर, नाचणे रोड, साळवी स्टाॅप , चर्मालय, कुवारबाव, एस.टी. स्थानक परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. घरपोच दूध विक्रीचे आवाहन केल्यामुळे सकाळी दुधाच्या गाड्या तेवढ्या फिरत होत्या. दोन तासांनंतर ही वाहनेही थांबली. त्यामुळे रस्ते मोकळे व शांत होते. पेट्रोल पंपावर ओळखपत्र तपासूनच ‘अत्यावश्यक सेवे’तील वाहनचालकांना पेट्रोल, डिझेल देण्यात येत होते. त्यामुळे पेट्रोल पंपांवरही शांतताच होती. औषधे दुकाने फक्त पूर्णवेळ सुरू आहेत.
औषध दुकाने तसेच कृषीविषयक सेवांसाठी प्रशासनाने बँकांचे व्यवहार दुपारी २ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यानुसार पन्नास टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत बँका सुरू होत्या. ‘अत्यावश्यक सेवे’तील कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी एस.टी सुरू होती. शहरी व ग्रामीण मार्गावर जेमतेम १५ ते २० फेऱ्या सुरू होत्या. मात्र, प्रवासी नव्हते. पोलीसही एस. टी. बसेसचीही तपासणी करत होते.
ग्रामीण भागात शुकशुकाट
जिल्हाभरात लाॅकडाऊन घोषित करण्यात आले असल्याने शहराबरोबर ग्रामीण भागातही कमालीची शांतता होती. किराणा, पिठाच्या गिरण्या, पानटपऱ्याही बंद ठेवण्यात आल्या होत्या. पोस्ट व बँका तसेच अन्य शासकीय कार्यालयांतून कामकाज मात्र सुरू होते. ग्रामीण भागातही पोलिसांकडून तपासणी सुरू असल्याने ग्रामस्थ घरातच होते. मान्सूनपूर्व पावसावर काही शेतकऱ्यांनी भात पेरणी सुरू केली आहे. त्यामुळे पेरणी व मशागतीच्या कामासाठी शेतकरी शेतात असले तरी संख्या मोजकीच होती.
पावसाळी वातावरण
बुधवारी रात्री पावसाने हजेरी लावली असली तरी गुरुवारी मात्र दिवसभर विश्रांती घेतली होती. मात्र, पावसाळी मळभ असल्याने हवेत गारवा आला आहे. खासगी आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश असल्याने शासकीय सेवेतील कर्मचारी, अधिकारीवगळता अन्य लोकांना सुट्टी मिळाली आहे. कोरोनाच्या धसक्यामुळे लोकांनी घराबाहेर पडणे टाळले होते. भाज्या, मासळी, फळे विक्रेत्यांनीही दुकाने, हाॅटेल व्यवसायांतर्गत मिळणारी पार्सल सेवाही बंद ठेवली होती. छोटे-मोठे सर्वच व्यवसाय बंद असल्याने शहरातील वर्दळ थांबली होती.