रत्नागिरी : विद्यार्थ्यांनी लुटला घोडेस्वारीचा आनंद, चिपळुणातील सती-चिंचघरी प्राथमिक शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 05:32 PM2018-04-21T17:32:47+5:302018-04-21T17:32:47+5:30
सह्याद्री शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा, खेर्डी - चिंचघरी सती येथे मोफत बालसंस्कार शिबिर पार पडले. या शिबिरात विद्यार्थ्यांनी घोडेस्वारीचा आनंद लुटला.
चिपळूण : सह्याद्री शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा, खेर्डी - चिंचघरी सती येथे मोफत बालसंस्कार शिबिर पार पडले. या शिबिरात विद्यार्थ्यांनी घोडेस्वारीचा आनंद लुटला.
वार्षिक परीक्षा संपल्या की, सर्वत्र संस्कार शिबिरे सुरु होतात. त्यासाठी भरमसाठ शुल्क आकारले जाते, अशावेळी पालकांच्या मनात आपल्या मुलालाही अशा संस्कार शिबिराला पाठवायचे असते. मात्र, आर्थिक अडचणीमुळे ते पाठवू शकत नाहीत.
याचा विचार करुन संस्थेने आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत संस्कार शिबिराचे आयोजन केले होते. वर्षभर अभ्यासक्रम शिकवत असताना मर्यादित वेळेमुळे संस्काराच्या बाबी थोड्या मागे राहतात. यासाठी १२ ते १८ या कालावधीत बालसंस्कार शिबिर झाले.
या शिबिरात सहा दिवस योगा, ध्यानधारणा, जनरल नॉलेज, विविध खेळ, हस्ताक्षर सुधारणा, मातीकाम, कागदकाम, चित्रकला, रांगोळी, निसर्ग सहल, जादूचे प्रयोग, मेहंदी काढणे यांसारखे विषय घेऊन मार्गदर्शन केले.
शिबिरासाठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अरविंद सकपाळ, शिशुविहारच्या मुख्याध्यापिका वंदना मोरे, इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सीमा खोत, स्कूलचे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.