रत्नागिरी : अचानक उष्म्यात वाढ; बागायतदार घामाघूम, आंब्यावर पुन्हा संकट, पुनर्मोहोरामुळे फळगळतीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 03:12 PM2018-01-18T15:12:15+5:302018-01-18T15:16:57+5:30
गेले चार दिवस हवामानात बदल जाणवत आहे. थंडीचा जोर ओसरला असून, उष्मा वाढला आहे. दिवसा कडकडीत ऊन असल्याने दिवसाचे तापमान हे ३३ अंश सेल्सियस इतके असते तर रात्री २३ अंश इतके तापमान खाली येत असल्याने काही प्रमाणात थंडी जाणवते. मात्र, या संमिश्र हवामानाचा आंबा पिकावर परिणाम होत आहे.
रत्नागिरी : गेले चार दिवस हवामानात बदल जाणवत आहे. थंडीचा जोर ओसरला असून, उष्मा वाढला आहे. दिवसा कडकडीत ऊन असल्याने दिवसाचे तापमान हे ३३ अंश सेल्सियस इतके असते तर रात्री २३ अंश इतके तापमान खाली येत असल्याने काही प्रमाणात थंडी जाणवते. मात्र, या संमिश्र हवामानाचा आंबा पिकावर परिणाम होत आहे.
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातील प्रचंड थंडीमुळे आंब्यावर मोहोर प्रक्रिया सुरू झाली आहे. फळधारणा झालेल्या झाडांनाही पुनर्मोहोर सुरू झाल्याने फळगळती वाढली आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांना घाम फुटला आहे.
ओखी वादळानंतर झालेल्या पावसामुळे पहिल्या टप्प्यातील फुलोऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यावेळी वाटाण्याएवढी झालेली फळे गळली शिवाय मोहोरही कुजून गेला. त्यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात थंडी वाढल्याने झडलेल्या मोहोरातून पुन्हा मोहोर प्रक्रिया सुरू झाली आहे.
पालवी जून होऊन मोहोर येऊ लागला आहे. याशिवाय मोहोराच्या ठिकाणी पुन्हा पुनर्मोहोर येऊ लागल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. निसर्गावर अवलंबून असणारे आंबापीक दिवसेंदिवस खर्चिक बनले असून, मकर संक्रांतीपासूनच्या संमिश्र हवामानामुळे तुडतुडा व कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोहोर व फळांच्या संरक्षणासाठी फवारणीचा मात्र खर्च वाढला आहे.
सन २०१४-१५मध्ये अवकाळी पावसामुळे आंबापीक धोक्यात आले होते. २०१५-१६मध्ये पुनर्मोहोर प्रक्रियेमुळे उत्पादन घटले. २०१६-१७मध्ये अधिकतम पर्जन्यमान होऊनही नोव्हेंबरपासून थंडी सुरू झाल्याने मोहोर प्रक्रिया लवकर झाली.
गतवर्षी आंबा चांगला झाला. मात्र, परराज्यातील आंबा त्याचवेळी बाजारात आला व हापूसचे दर कोसळले. शेतकऱ्यांना अपेक्षित दर न मिळाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यावर्षी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या ओखी वादळानंतर अवकाळी पावसामुळे मोहोर कुजला. वाटाण्याएवढी झालेली फळे गळून पडली. कल्टार, वोल्टारसारखी संजीवके वापरलेल्या शेतकऱ्यांना वादळी पावसाचा चांगलाच फटका बसला.
सध्या कमाल ३३ तर किमान २३ अंश सेल्सियस इतके तापमान आहे. दिवसभर उष्मा असतो तर रात्री तापमान खाली येते. या संमिश्र हवामानामुळे तुडतुड्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यातील मोहोर पावसामुळे वाया गेला तर दुसऱ्या टप्प्यातील मोहोराला फळधारणा झाली आहे. मात्र, अतिथंडीमुळे फळधारणा झालेल्या मोहोरातून पुनर्मोहोर सुरू झाल्यामुळे फळधारणेला धोका निर्माण झाला आहे.
बोराएवढी झालेली फळे गळू लागली आहेत. दुसऱ्या टप्प्यातील आंबा नैसर्गिक दृष्टचक्रातून वाचला तर मार्चअखेर अथवा एप्रिलमध्ये बाजारात येण्याची शक्यता आहे. मात्र, फळगळ वाढल्याने त्याचेही प्रमाण अत्यल्प असण्याचा संभव आहे.
डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून तिसऱ्या टप्प्यातील मोहोर सुरू झाला आहे. पहिल्या टप्प्यातील झडून गेलेल्या मोहोराच्या देठातून मोहोर येऊ लागला आहे. गेल्या चार दिवसात थंडीचा जोर ओसरला आहे. दिवसा सुटणारे वारे बंद झाले असून, उष्मा मात्र बऱ्यापैकी वाढला आहे.
रात्री तापमान खाली येत असले तरी दव पडत नाही. संमिश्र हवामानामुळे काही ठिकाणी मोहोर काळवंडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फवारणीचा अधिक खर्च करावा लागत आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातील निच्चांकी तापमानामुळे तिसऱ्या टप्प्यातील नवीन मोहोर प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, त्याचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते.
ओखी वादळामुळे पहिल्या टप्प्यातील मोहोर कुजून गेला. दुसऱ्या टप्प्यातील मोहोराला नुसताच फुलोरा आला. त्यानंतर जानेवारीच्या सुरूवातीला थंडीचे प्रमाण वाढले शिवाय तिसऱ्या टप्प्यातील मोहोरही सुरू झाला. मात्र, त्याचबरोेबर पुनर्मोहोर प्रक्रिया झाल्याने फळधारणेला धोका निर्माण झाला. मकर संक्रांतीपासून पुन्हा हवामानात बदल झाला. दिवसा उष्मा व रात्री थंडी असे विचित्र हवामान असून, ते आंब्याला पोषक नाही. त्यामुळे आंबापिकाचे दिवसेंदिवस नुकसान होत आहे.
- टी. एस. घवाळी,
आंबा बागायतदार, रत्नागिरी.