रत्नागिरी : उष्णतेने फेब्रुवारीतच फुटला घाम, मे महिन्यात तीव्र उन्हाळा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 01:39 PM2018-02-27T13:39:38+5:302018-02-27T13:39:38+5:30
फेब्रुवारी महिन्यानेच रत्नागिरीकरांना हैराण करून सोडले आहे. महिना संपायला अजूनही दोन दिवसांचा अवधी असताना रत्नागिरीकरांना घाम फुटला आहे. कारण रत्नागिरीचा पारा दरदिवशी वाढतच आहे. सोमवारी रत्नागिरीचा पारा तब्बल ३8 अंशावर स्थिरावल्याने उष्म्याचा झालेला कहर लक्षात येईल.
विहार तेंडुलकर
रत्नागिरी : फेब्रुवारी महिन्यानेच रत्नागिरीकरांना हैराण करून सोडले आहे. महिना संपायला अजूनही दोन दिवसांचा अवधी असताना रत्नागिरीकरांना घाम फुटला आहे. कारण रत्नागिरीचा पारा दरदिवशी वाढतच आहे. रत्नागिरीचा पारा मंगळवारी तब्बल ३८ अंशावर स्थिरावल्याने उष्म्याचा झालेला कहर लक्षात येईल.
सायंकाळ झाल्यानंतर उष्मा काहीसा कमी होत असला तरी दिवसभर तापमान जास्त असल्याने रत्नागिरीकर हैराण झाले आहेत. मार्चची तीव्रता अजूनही यायची आहे. सध्या फेब्रुवारी महिना सुरु असतानाच रत्नागिरीकरांच्या डोक्यावर ३८ अंश सेल्सिअस एवढी उष्णता आहे. त्यामुळे सकाळी ९ वाजल्यापासूनच दुपारएवढ्या घामाच्या धारा लागत आहे.
प्रतिवर्षी वाढत जाणारी उष्मा चिंतेचा कारण ठरत असताना यंदा आतापासूनच उष्म्याने कहर केल्याने येणारा मे महिना हा कडक उन्हाळ्याचाच असेल, अशी चर्चा आहे. सोमवारी रत्नागिरीचे तापमान हे कमाल ३७ तर किमान २८ अंश सेल्सिअस एवढे होते.
फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला हे तापमान कमाल ३१ तर किमान २४ अंश सेल्सिअस एवढे होते. गेल्या २० दिवसात अचानक तापमानात झालेली वाढ चिंतेचा विषय बनली आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ही तापमावाढ सुरु झाली आहे. पहिल्या पंधरवड्यात गुलाबी थंडीचा अनुभव घेतल्यानंतर गेल्या आठ दिवसात तापमानाची वाढ दिसून येत आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, रत्नागिरीचे फेब्रुवारीत सर्वसाधारण कमाल तापमान हे ३१ ते ३२ अंश सेल्सिअसपर्यंत असते. मात्र आता ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. तर सर्वसाधारण किमान तापमान हे २० अंश सेल्सिअस असते. ते २६ फेब्रुवारीला तेच कायम होते.
महावितरणचा दिलासा
तापमान वाढल्याने साहजिकच वीजेचा वापरही वाढला आहे. मात्र महावितरणने अखंड वीजपुरवठा करून ग्राहकांना उष्म्यात दिलासा दिला आहे.
मार्चमध्ये दिलासा ?
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, तापमानात झालेली ही वाढ फेब्रुवारीच्या अखेरच्या दिवसापर्यंत म्हणजेच २८ फेब्रुवारीपर्यंत कायम राहणार आहे. मात्र १ मार्चपासून त्यामध्ये थोडाफार दिलासा मिळू शकतो. १ मार्च ते ४ मार्च दरम्यान हे तापमान २ ते ३ अंश सेल्सिअसने कमी होऊ शकते, असे हवामान खात्याने म्हटले आहे.