रत्नागिरी : वेध उन्हाळी सुट्ट्यांचे; नियोजन जादा गाड्यांचे, विभागातून ४६ जादा गाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 05:55 PM2018-03-31T17:55:00+5:302018-03-31T17:55:00+5:30
शालेय परीक्षा अंतिम टप्प्यात असून, उन्हाळी सुटी १५ एप्रिलपासून सुरू होणार आहे. खासगी शाळांच्या परीक्षा १३ रोजी संपत आहेत, तर शासनमान्य शाळांच्या परीक्षा १५ रोजी संपणार आहेत. परीक्षेनंतर अनेक विद्यार्थी, पालकांसमवेत गावी येत असतात. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी रत्नागिरी विभागातून ७ एप्रिलपासून एकूण ४६ जादा गाड्यांची सुविधा उपलब्ध केली आहे.
रत्नागिरी : शालेय परीक्षा अंतिम टप्प्यात असून, उन्हाळी सुटी १५ एप्रिलपासून सुरू होणार आहे. खासगी शाळांच्या परीक्षा १३ रोजी संपत आहेत, तर शासनमान्य शाळांच्या परीक्षा १५ रोजी संपणार आहेत. परीक्षेनंतर अनेक विद्यार्थी, पालकांसमवेत गावी येत असतात. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी रत्नागिरी विभागातून ७ एप्रिलपासून एकूण ४६ जादा गाड्यांची सुविधा उपलब्ध केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक मंडळी नोकरी व्यवसायानिमित्ताने मुंबईत आहेत. अनेकांची कुटुंब मुंबईत असली तरी सुटीच्या कालावधीत मंडळी गावाकडे येत असतात. कोकण रेल्वेने उन्हाळी हंगामासाठी जादा गाड्या सुरू केल्या आहेत.
कोकण रेल्वे जिल्ह्यातील वाडी - वस्तीवरील ग्रामस्थांसाठी उपयोगी नसल्यामुळे त्यांना एस. टी.चा आधार ठरतो. त्यामुळे रत्नागिरी विभागाने जिल्ह्यातील काही आगारातील प्रमुख मार्गावर एस. टी. गाड्या सुरू केल्या आहेत.
दापोली ते भार्इंदर, कल्याण, विठ्ठलवाडी, मुंबई, ठाणे, बोरिवली, उंबरघर ते ठाणे मार्गावर ८ गाड्या सोडण्यात येणार आहेत. १३ एप्रिल ते १ मेपर्यंत या गाड्यांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. खेड ते बोरिवली, खेड ते ठाणे व खेड -पिंपळोली ते मुंबई मार्गावर ३ जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. २१ एप्रिल ते ५ मेपर्यंत गाड्यांचे नियोजन केले आहे.
चिपळूण ते चिंचवड, चिपळूण मंजुत्री ते बोरिवली, चिपळूण ते बोरिवली, भांडूप, ठाणे मार्गावर सहा जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. २८ एप्रिल ते १ मेपर्यंत गाड्यांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. गुहागर ते भांडूप, बोरिवली, चिंचवड, विरार मार्गावर ६ जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. ७ ते दि. २८ एप्रिलपर्यंत गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
देवरूख ते मुंबई, स्वारगेट, करजुवे ते बोरिवली, देवरूख ते कल्याण, देवडे ते मुंबई, देवरूख ते बोरिवली मार्गावर ७ जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. सर्व गाड्या २८ एप्रिल रोजी सोडण्यात येणार आहेत.
रत्नागिरी आगारातून आंबोळगड - मुंबई, रत्नागिरी ते नालासोपारा, निगडी, अक्कलकोट, कोल्हापूर - इस्लामपूर मार्गावर ८ जादा गाड्या सोडण्यात येणार आहे. १३ ते २८ एप्रिलअखेर या गाड्या सोडण्यात येणार आहेत.
लांजा ते बोरिवली मार्गावर दोन गाड्या १३ एप्रिल रोजी, राजापूर ते नालासोपारा व राजापूर ते पाचलमार्गे पुणे मार्गावर २ जादा गाड्या दि. २१ व २८ एप्रिल रोजी सोडण्यात येणार आहेत. मंडणगड आगारातून केळशी ते नालासोपारा, मंडणगड ते बोरिवली, मंडणगड - दाभट बोरिवली, खरवते ते नालासोपारा मार्गावर ४ जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
१३ ते २८ एप्रिलअखेर या गाड्या सोडण्यात येणार आहे. या गाड्यांच्या नियोजनासाठी एस्. टी. महामंडळाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात येणाऱ्या आणि बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये याची काळजीही घेतली जाणार आहे.
ग्रामीण भागाची जीवनवाहिनी
ग्रामीण भागाची जीवनवाहिनी ठरलेली एस. टी. वाडीवस्तीवर पोहोचली आहे. रत्नागिरी विभागात ७३४ गाड्या असून, दररोज ४५०० फेºयांव्दारे २ लाख १६ हजार किलोमीटर वाहतूक केली जाते. विभागात १५५० वाहक व १८०० चालक कार्यरत असून, अडीच लाख प्रवाशांची वाहतूक करण्यात येते.
मे महिन्यात मुंबईकर मोठ्या संख्येने गावी येत असतात. त्यासाठी रत्नागिरी विभागाने यावर्षी ४६ जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय दैनंदिन ८७ गाड्यातून मुंबई मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू असून, ती पुढे सुरूच राहणार आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार गाड्यांची संख्या वाढविण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली.
वाहक, चालक निश्चित
राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व विभागातून उन्हाळी सुटीसाठी जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. रत्नागिरी विभागाने जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. विभागातर्फे ४६ जादा गाड्यांसाठी ९२ वाहक व ९२ चालक निश्चित करण्यात आले आहेत.
आॅनलाईन तिकीट सेवा
रत्नागिरी विभागातर्फे उन्हाळी सुटीसाठी ४६ जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. १५ जूनला शाळा सुरू होणार असल्यामुळे १५ जूनपर्यंत जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार गाड्यांच्या संख्येत वाढ करण्यात येईल.
महामंडळाची आॅनलाईन तिकीट सेवा उपलब्ध आहे. कॅशलेसमुळे रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानक व विभागातील अन्य आगारांमध्येही स्वॅपिंग मशीन बसवण्यात आली आहेत.