रत्नागिरी : स्वाभिमान - शिवसेनेत पुन्हा वादाची ठिणगी?, नीलेश राणे यांच्या ट्विटला उदय सामंतांचे उत्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 04:08 PM2018-09-25T16:08:57+5:302018-09-25T16:28:56+5:30
शिवसेना आणि स्वाभिमान पक्षातील वाद अजूनही सुरूच आहे. म्हाडा अध्यक्ष म्हणून उदय सामंत यांच्यावर माजी खासदार नीलेश राणे यांनी ट्वीटरवरून वार केला आणि पाठोपाठ उदय सामंत यांनी त्याला प्रत्युत्तर दिले आहे. बाकी पक्षांमध्ये सध्या शांतता असली तरी शिवसेना आणि स्वाभिमान यांच्यातील कलगी-तुरा सुरूच आहे.
रत्नागिरी : शिवसेना आणि स्वाभिमान पक्षातील वाद अजूनही सुरूच आहे. म्हाडा अध्यक्ष म्हणून उदय सामंत यांच्यावर माजी खासदार नीलेश राणे यांनी ट्वीटरवरून वार केला आणि पाठोपाठ उदय सामंत यांनी त्याला प्रत्युत्तर दिले आहे. बाकी पक्षांमध्ये सध्या शांतता असली तरी शिवसेना आणि स्वाभिमान यांच्यातील कलगी-तुरा सुरूच आहे.
गतमहिन्यात एका वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात स्वाभिमान आणि शिवसेना यांच्यामध्ये वादाची पहिली ठिणगी पडली. जैतापूर प्रकल्पाला आमदार उदय सामंत यांचा पाठिंबा असल्याचा एक व्हिडिओ एका कार्यकर्त्याने दाखवला.
anti corruption सेल ला मी ह्या शिवसेनेच्या आमदाराबद्दल तक्रार देऊन ठेवणार आहे. बिल्डरानां नोटीस देऊन पैसे काढायची सवय आहे ह्याला. 4 वर्षांनी पद मिळालं आहे भूकेलेला असणार. बघूया किती लोकांना ताबा देतो. pic.twitter.com/KVfQwUyUk7
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 19, 2018
स्वाभिमान पक्षाचा तो असल्याने शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी त्याला धक्काबुक्की केली. त्यानंतर दोनच दिवसात शिवसेनेच्या उपशहर प्रमुखाचे केशकर्तनालय काही लोकांनी फोडले. या प्रकरणात स्वाभिमान पक्षाच्या काही कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला. या दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमधील हा वाद अजूनही धुमसत आहे.
निवडणुकीपर्यंत आरोप-प्रत्यारोपांच्या माध्यमातून हा वाद सुरूच राहील, असे स्पष्ट दिसत आहे. घरांचा ताबा न देणाऱ्या बिल्डरला नोटीस काढणार असल्याचे उद्गार म्हाडाचे अध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर उदय सामंत यांनी एका पत्रकार परिषदेत काढले होते. मुंबईतील लोढा बिल्डर्सने पैसे भरूनही लाभार्थींना घरांचा ताबा दिला नव्हता. त्यामुळे हा ताबा लगेचच देण्यासाठी त्यांना म्हाडाकडून नोटीस काढण्यात येईल, असे आमदार सामंत यांनी सांगितले.
माजी खासदार नीलेश राणे यांनी याच वक्तव्याचा आधार घेत ट्वीटरवर चांगलाच समाचार घेतला होता. बिल्डरना नोटीस देऊन पैसे काढण्याची सवय असलेल्या शिवसेना आमदाराविरोधात आपण लाचलुचपत खात्याकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी ट्वीट केले. राणे यांनी केलेल्या या ट्वीटचा उल्लेख न करता आमदार उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
चिपळूण येथे आमदार सदानंद चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात बोलताना आमदार सामंत म्हणाले की, मुंबईमध्ये कल्याण - डोंबिवली येथे म्हाडामधील घरांसाठी अनेक लोकांनी पैसे भरले आहेत. मात्र, त्यांची घरे कोठे आहेत, हे त्यांनाच माहिती नाही. बिल्डरने त्यांना ही घरे दाखवलेलीच नाहीत.
भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा हे या प्रकल्पाचे काम करत आहेत. राज्य सरकारमध्ये त्यांचे मोठे वजन आहे. म्हाडाची घरे ही सर्वसामान्य लोकांसाठीची असल्याने आपण म्हाडाकडून ही नोटीस पाठवली आहे. हे सांगतानाच आमदार सामंत यांनी आपण शिवसेनेचे आमदार असल्याने कोणाला घाबरत नसल्याची पुष्टीही जोडली आहे.
शिवसेनेवर हल्लाबोल सुरूच राहणार
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून नीलेश राणे निवडणूक लढवणार असल्याचे भाजपचे खासदार नारायण राणे यांनी स्वाभिमान पक्षाच्या रत्नागिरीतील मेळाव्यात स्पष्ट केले होते. त्यामुळे नीलेश राणे यांनी रत्नागिरीतील घडामोडी विशेषत: शिवसेनेच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले आहे. निवडणुकीपर्यंत शिवसेनेवर हल्लाबोल करण्याची शक्यता आहे.