रत्नागिरी : मद्यधुंद शिक्षकावर कारवाई करावी, पंचायत समितीचा अहवाल : शिक्षण विभागाकडे लवकरच सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 04:53 PM2018-06-19T16:53:12+5:302018-06-19T16:53:12+5:30
देवाचे गोठणेमधील शाळेत आलेल्या त्या मद्यधुंद शिक्षकावर कारवाई करण्यात यावी असा अहवाल रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे दिला असल्याची माहिती राजापूर पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी मुरलीधर वाघाटे यांनी दिली.
राजापूर : देवाचे गोठणेमधील शाळेत आलेल्या त्या मद्यधुंद शिक्षकावर कारवाई करण्यात यावी असा अहवाल रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे दिला असल्याची माहिती राजापूर पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी मुरलीधर वाघाटे यांनी दिली.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी देवाचे गोठणेमधील ठोमरेवाडीतील शाळेत कार्यरत असणारा हा शिक्षक मद्यपान करुन आला होता. त्यावेळी शाळेत उपस्थीत असलेल्या पालकांनी त्या शिक्षकाला राजापूर ग्रामीण रुग्णालयात आणून त्याची तपासणी करवली होती.
त्यामध्ये त्याने मद्य सेवन केल्याचे वैद्यकीय अहवालातून समोर आले होते. त्याची राजापूर पंचायत समिती प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. मागील दोन वर्षे त्या शिक्षकाच्या नशेबाबत तक्रारी होवूनदेखील त्याकडे साफ दुर्लक्ष केल्याने राजापूर पंचायत समिती प्रशासन व शिक्षण विभागावर टिका करण्यात आली होती.
त्यामुळे यावेळी पंचायत समिती प्रशासनाने त्या शिक्षकावर कारवाई करण्यात यावी, असा अहवाल जिल्हा परीषद शिक्षण विभागाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती येथील सहाय्यक गटविकास अधिकारी मुरलीधर वाघाटे यांनी दिली. त्यामुळे आता त्या मद्यधुंद शिक्षकावर कारवाई होणार हे निश्चीत आहे.
दरम्यान इयत्ता चौथीपर्यंत एक शिक्षकी असलेल्या त्या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवु नये म्हणुन अन्य शाळेतील एक शिक्षक कामगिरीवर देण्यात आला आहे, अशी माहिती राजापूर पंचायत समिती प्रशासनाकडुन देण्यात आली आहे.