रत्नागिरी : गायींची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करा, ग्रामस्थांचा मुंबई-गोवा महामार्ग रास्तारोको
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 09:08 AM2019-01-26T09:08:58+5:302019-01-26T11:55:55+5:30
गायींची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी खेड तालुक्यातील पीरलोटे येथील ग्रामस्थांनी मुंबई-गोवा महामार्ग अडवला आहे.
रत्नागिरी -गायींची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी खेड तालुक्यातील पीरलोटे येथील ग्रामस्थांनी मुंबई-गोवा महामार्ग अडवला आहे. त्यामुळे येथील वाहतूक ठप्प झाली आहे. कत्तल करण्यासाठी गायींची वाहतूक केली जात असल्याचा संशय ग्रामस्थांना आहे. याविरोधात ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन केले. यावेळेस लोकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज करण्याचे आदेश देणारे उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वेश्वर नांदेडकर यांना धक्काबुक्की करुन ग्रामस्थांनी पोलिसांची गाडी पेटवली. इतर गाड्यांवरही दगडफेक झाली. यामध्ये एस.टी.बससह काही अन्य गाड्याही फोडण्यात आल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून लोटे परिसरात गोवंश हत्येची चर्चा सुरू आहे. यावर ग्रामस्थ पाळत ठेवून होते. शनिवारी (26 जानेवारी) पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांनी एक गाडी अडवली. यात एक गाय होती. मात्र गाडीतील लोक बंदुक आणि तलवारीचा धाक दाखवून पळून गेल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या लोकांवर तातडीने कारवाई करावी, या मागणीसाठी महामार्ग अडवण्यात आला आहे.
लोकांना बाजूला करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वेश्वर नांदेडकर यांनी लाठीहल्ला करण्याचे आदेश दिले. यामुळे जमाव संतप्त झाला आणि त्यांनी नांदेडकर यांना धक्काबुक्की केली. तेवढ्यावरच न थांबता लोकांनी पोलिसांची गाडीही पेटवून दिली.
यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वेश्वर नांदेडकर, खेडचे पोलीस निरीक्षक अनिल हे गंभीर स्वरुपात जखमी झाले आहेत.