रत्नागिरीत शौचालय घोटाळा

By admin | Published: February 12, 2016 10:19 PM2016-02-12T22:19:31+5:302016-02-12T23:44:52+5:30

नीलेश राणेंचा आरोप : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

Ratnagiri toilet scam | रत्नागिरीत शौचालय घोटाळा

रत्नागिरीत शौचालय घोटाळा

Next

रत्नागिरी : स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या शौचालय उभारणीमध्ये घोटाळा झाला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन संपूर्ण माहिती बाहेर यावी, अशी मागणी रत्नागिरी - सिंंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी खासदार नीलेश राणे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्याकडे दिले आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी घर ते शौचालयङ्खया अभियानाला २ आॅक्टोबर २०१४पासून देशभरात सुरूवात झाली. दारिद्र्यरेषेवरील आणि दारिद्र्यरेषेखालील कोणत्याही लाभार्थीला या योजनेमध्ये शासनाकडून १२ हजार रुपयांचे अनुदान प्राप्त होते. यातील ९ हजार रुपये केंद्र, तर ३ हजार रुपये राज्य शासनाचा वाटा आहे. उर्वरित पैसे लाभार्थीने स्वत:चे भरावयाचे होते. यासाठी रत्नागिरी जिल्ह्याला ३१ डिसेंबर २०१५ची डेडलाईन देण्यात आली होती.
याबाबतचे पंचायत समिती स्तरावर प्रशिक्षण देण्यासाठी ४० हजार रुपयांचा खर्चही झाल्याचे समजते. गावागावात जाऊन दवंडी पिटून ग्रामस्थांमध्ये जागृती करण्यात आली. या योजनेसाठी लाभार्थी ठरविताना सन २०१४ रोजी झालेल्या बेसलाईन सर्वेक्षणाचा उपयोग केला गेला. प्रत्यक्ष लाभार्थ्याने हे शौचालय उभारणे अपेक्षित होते.
योजनेच्या अंमलबजावणीला प्रत्यक्ष सुरुवात झाली. त्यावेळी अनेक ठिकाणी ठेकेदाराकडून हे काम केल्याचे निदर्शनास आल्याचे आयबीएन लोकमत या वृत्तवाहिनीच्या वृत्तामध्ये म्हटले आहे. त्याशिवाय सिमेंटचे पत्रे वापरून निकृष्ट दर्जाचे शौचालय उभारल्याचेही या वृत्तामध्ये दिसून आले.
यामध्ये सरकारी निधीचा गैरवापर झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. यासाठी सर्व प्रकरणाची चौकशी करावी आणि संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नीलेश राणे यांनी या निवेदनाद्वारे केली आहे. त्यासाठी त्यांनी पाठपुरावाही सुरू ठेवला आहे. (प्रतिनिधी)

जिल्हा हादरला : शासकीय यंत्रणा खडबडून जागी
रत्नागिरी जिल्ह्यात शौचालय बांधणीत घोटाळा झाल्याचे वृत्त पसरताच शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. या घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी माजी खासदार नीलेश राणे यांनी आवाज उठविला आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.


जिल्ह्यावर लक्ष
माजी खासदार नीलेश राणे यांनी जिल्ह्यात पुन्हा दौरे करण्यास सुरूवात केली आहे. जिल्ह्यातील विविध कामांकडे लक्ष देण्याबरोबरच कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरूवात केली आहे. पक्ष बांधणीकडेही त्यांनी विशेष लक्ष दिले आहे.


स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून काम.
शौचालय उभारणीमध्ये घोटाळा झाल्याचे वृत्त प्रसारीत.
सरकारी निधीचा गैरवापर.

Web Title: Ratnagiri toilet scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.