रत्नागिरी : फिरत्या चाकावर ती हाकतेय संसाराचा गाडा, जोपासला पारंपरिक कुंभार व्यवसाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 02:04 PM2018-04-23T14:04:23+5:302018-04-23T14:04:23+5:30
पालपेणे-कुंभारवाडी येथील रुक्मिणी धोंडू नांदगावकर या वयोवृद्ध महिलेने मातीपासून माठ तसेच विविध वस्तूंना आकार देत आपला पारंपरिक तीन पिढ्यांपासूनचा कुंभार व्यवसाय आजही जोपासला आहे.
मंदार गोयथळे
असगोली : पालपेणे-कुंभारवाडी येथील रुक्मिणी धोंडू नांदगावकर या वयोवृद्ध महिलेने मातीपासून माठ तसेच विविध वस्तूंना आकार देत आपला पारंपरिक तीन पिढ्यांपासूनचा कुंभार व्यवसाय आजही जोपासला आहे.
आजच्या धावपळीच्या व स्पर्धेच्या युगात पारंपरिक व्यवसायाकडे दुर्लक्ष होत चालले आहे. आजची तरुण पिढी आपला पारंपरिक व्यवसाय पुढे नेण्यास तयार नसल्याचे दिसून येते. प्रत्येक तरूणाला शहरातील नोकरीची ओढ असते. त्यामुळे विविध पारंपरिक व्यवसाय लोप पावण्याच्या स्थितीत आल्याचे ग्रामीण भागात दिसून येत आहे.
गुहागर तालुक्यातील पालपेणे - कुंभारवाडी येथे नांदगावकर कुटुंबियांचा पारंपरिक कुंभार व्यवसाय सुमारे ३ पिढ्यांपासून सुरु आहे. हा व्यवसाय आजही रुक्मिणी धोंडू नांदगावकर या आपल्या वयोवृद्ध अवस्थेत सांभाळत आहेत. या व्यवसायामध्ये त्यांना मुलगा उदय व सून नेहा यांचे सहकार्य लाभत आहे.
आपल्या या कुंभार व्यवसायामध्ये माठ तसेच मातीच्या विविध वस्तू बनवण्याचे काम हे कुटुंब करत आहे. मुळातच माठ बनवणे ही अवघड कला आहे. त्यातही माठ घडवणे अतिशय कठीण काम असून, नेमके हेच काम आजपर्यंत आपला मुलगा व सून यांना तितकेसे प्रभावीपणे जमत नसल्याचे रुक्मिणी नांदगावकर सांगतात.
विशेष म्हणजे त्यांच्या या मातीच्या विविध वस्तू अनेक ठिकाणी प्रदर्शनासाठीदेखील गेल्या आहेत. वेळणेश्वर येथील प्रदर्शनात त्यांना रोख ५ हजार रुपयांचे पारितोषिकही देण्यात आले होते.
माठ बनवण्यासाठी मातीला आकार देणे, हे मोठे जिकरीचे काम आहे. परंतु ओल्या मातीत राहून मातीच्या विविध वस्तू घडवण्याचे कौशल्य आपल्या म्हातारपणीही रुक्मिणी नांदगावकर यांनी आजही जोपासले आहे. प्लास्टिकपासून होणारे दुष्परिणाम थांबवण्याकरिता या कुंभार व्यवसायाला नवसंजिवनी मिळणे आज काळाची गरज बनली आहे.
आर्थिक पाठबळ हवे..
आपला कुंभार व्यवसाय गेल्या कित्येक पिढ्यांपासून सुरु आहे. या व्यवसायात मुलगा व सून यांचे चांगले सहकार्य मिळते. आपण बनवलेल्या वस्तूंना मोठ्या प्रमाणात मागणी असते. आर्थिक पाठबळाअभावी पाहिजे तशी गती देता येत नाही, असे त्या म्हणतात.