रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी रेल्वे कोकण आतापासूनच फुल्ल, अनेक गाड्यांचे बुकिंग बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 05:29 PM2018-05-16T17:29:19+5:302018-05-16T17:29:19+5:30
कोकणातील मोठा सण असलेल्या गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेची दारे बंद झाली आहेत. कारण तीन महिने अगोदर आरक्षणाची सुविधा असल्याने अनेकांनी आरक्षण आधीच करून ठेवल्याने आयत्यावेळी किंवा यावर्षीे कधीही गणेशोत्सवात कोकणात येण्याचा बेत आखला तर तो तडीस जाणे मुश्किल ठरणार आहे. कारण बहुतांश रेल्वेगाड्यांचे आरक्षण आतापासूनच बंद झाले आहे.
विहार तेंडुलकर
रत्नागिरी : कोकणातील मोठा सण असलेल्या गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेची दारे बंद झाली आहेत. कारण तीन महिने अगोदर आरक्षणाची सुविधा असल्याने अनेकांनी आरक्षण आधीच करून ठेवल्याने आयत्यावेळी किंवा यावर्षीे कधीही गणेशोत्सवात कोकणात येण्याचा बेत आखला तर तो तडीस जाणे मुश्किल ठरणार आहे. कारण बहुतांश रेल्वेगाड्यांचे आरक्षण आतापासूनच बंद झाले आहे.
कोकणात गणेशोत्सव हा मोठा सण मानला जातो. गेल्या काही वर्षात मे महिन्यात प्रदीर्घ सुट्टी असताना त्यापेक्षा गणेशोत्सवातच मुंबईकरांची गर्दी जास्त होते. रेल्वेने तीन महिने आगाऊ आरक्षणाची सोय उपलब्ध करून दिल्याने आता गणेशोत्सवात कोकणात यायचे असेल तर त्याचे सुट्टीपासूनचे ते अगदी रेल्वे आरक्षणापर्यंतचे नियोजन तीन महिने अगोदरच करावे लागते.
त्यानंतरच कोकणातील गणेशोत्सवाचे मुंबईकरांना दर्शन होते आणि कोकणातील प्रत्येक घरात गणेशोत्सवात मुंबईकर आवर्जुन येतोच. त्यामुळे रेल्वे आरक्षण सुरु झाल्यानंतर त्यावर अक्षरश: उडी पडते.
यंदा गणेशोत्सव १३ सप्टेंबरपासून सुरु होत आहे. त्यामुळे कोकण रेल्वेचे गणेशोत्सवासाठीचे आरक्षण १० तारखेपासूनच सुरु झाले आहे. मात्र, एका दिवसातच ते फुल्ल झाले. आरक्षण फुल्ल झाल्यानंतर पुढील दोन दिवसात काही गाड्यांचे आरक्षण यंत्रणाही बंद करण्यात आली आहे.
आरक्षणाची प्रतीक्षा यादी ठराविक संख्येपेक्षा जास्त झाली की, आरक्षण बंद करण्यात येते. अशा तऱ्हेने अनेक रेल्वेगाड्यांचे आरक्षण आतापासूनच बंद झाले आहे. १३ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाची कोकण रेल्वेने सर्वात अगोदर चाहुल दिली आहे. मात्र, दुसरीकडे रेल्वेचे आरक्षणच संपून गेल्याने हताश होण्याची वेळ मुंबईकरांवर आली आहे.
गणेशोत्सवाच्या पहिल्या दोन दिवसांचे आरक्षण मिळत नसेल तर काहीजण गौरीच्या सणाला येण्याचा प्रयत्न करतात. गणेशोत्सवात गौरीपूजनालाही कोकणात येणाºयांची संख्या मोठी आहे. गौरी विर्सजन झाल्यानंतर कोकणात येणाऱ्यांची गर्दी कमी होते.
पाच दिवस अगोदरपासूनच गर्दी
यंदा गणेशोत्सव १३ सप्टेंबरला म्हणजेच गुरुवारी येत आहे. त्याअगोदर ८ तारखेला शनिवार, तर ९ तारखेला रविवार येत आहे. हरितालिका तृतीया १२ सप्टेंबर रोजी आहे. त्यामुळे ज्यांना ११ किंवा १२ तारखेचे आरक्षण मिळाले नाही, त्यांनी अगदी ८ तारखेचेही आरक्षण केले आहे. त्यामुळे ८ तारखेपासून बहुतांश गाड्यांचे पुढील आरक्षण कोकण रेल्वेने बंद केले आहे.
...या गाड्यांचे आरक्षण बंद
दादर - सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, कोकणकन्या एक्स्प्रेस याबरोबरच दादर - रत्नागिरी - मडगाव पॅसेंजर या गाड्यांचे आरक्षणच बंद करण्यात आले आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना अन्य पर्याय शोधावे लागणार आहेत.
तेजसचा आधार
सर्वात वेगवान आणि आलिशान रेल्वे असलेल्या तेजस एक्स्प्रेस या गाडीचे ९ सप्टेंबरचे आरक्षण सध्या उपलब्ध आहे. पुढील काही दिवसात तेही फुल्ल होण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवात दुसरा पर्याय नसल्याने सामान्य प्रवासीही तेजसकडे वळतात.
प्रतीक्षा यादी लांबच लांब
कोकणकन्याची प्रतिक्षा यादी ९०८पर्यंत, तुतारी एक्स्प्रेस-८१३पर्यंत, जनशताब्दी -११७८पर्यंत, मांडवी एक्स्प्रेस-४३८ पर्यंत प्रतिक्षा यादी आहे. या सर्व गाड्यांचे आरक्षण बंद करण्यात आले आहे.
अनारक्षित गाड्यांचा पर्याय पण...
गणेशोत्सवात कोकणासाठी अनारक्षित गाड्यांचा पर्याय ठरू शकतो. मात्र, कोकण रेल्वेने आजपर्यंत यावर विचारच केलेला नाही. अनारक्षित गाड्या सोडून गर्दीवर नियंत्रण मिळवता येऊ शकते. पॅसेंजर रेल्वेची सुविधा झाल्यास त्यामधून प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणावर होऊ शकते. डेमू हाही एक मोठा पर्याय आहे. पण पॅसेंजर गाडीचा पर्याय अद्याप अवलंबलेला नाही.
जादा रेल्वेंकडे लक्ष
गणेशोत्सवात घरी येण्याची उत्कट इच्छा असतानाही ती अपूर्ण राहात असल्याने आता भक्तगणांना गणेशोत्सवाबरोबरच आस लागली आहे ती जादा रेल्वेगाड्यांची. रत्नागिरी ते दादर आणखी एका गाडीची प्रतीक्षा आहे.