रत्नागिरी : कोसुंब येथे हळदीची शेती, प्रयोगशील शेतकरी, भातशेतीऐवजी हळद लागवडीवर दिला भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 03:37 PM2018-06-28T15:37:16+5:302018-06-28T15:38:12+5:30
शेतीमध्ये अधिक रुची असल्याने वयाच्या सत्त्याहत्तराव्या वर्षीदेखील त्याच उमेदीने आणि जोमाने आपले शेतीचे काम सुरु ठेवलेय ते संगमेश्वर तालुक्यातील कोसुंंब गावातील प्रयोगशील शेतकरी यशवंत जाधव यांनी. शेती क्षेत्रातील प्रयोगशीलतेचा विचार केला तर तरुणांना प्रेरणादायी ठरावं, असं त्यांचे व्यक्तिमत्व.
सचिन मोहिते
देवरुख : शेतीमध्ये अधिक रुची असल्याने वयाच्या सत्त्याहत्तराव्या वर्षीदेखील त्याच उमेदीने आणि जोमाने आपले शेतीचे काम सुरु ठेवलेय ते संगमेश्वर तालुक्यातील कोसुंंब गावातील प्रयोगशील शेतकरी यशवंत जाधव यांनी. शेती क्षेत्रातील प्रयोगशीलतेचा विचार केला तर तरुणांना प्रेरणादायी ठरावं, असं त्यांचे व्यक्तिमत्व. पारंपरिकतेला छेद देऊन त्यांनी यावर्षी एक एकर जमिनीत भातशेतीऐवजी हळद लागवडीवर भर दिला आहे.
यशवंत जाधव यांनी यापूर्वी आपल्या जमिनीत विविध पिके घेतली आहेत. उन्हाळी शेतीतून बटाटा उत्पादनाचा प्रयोगदेखील त्यांनी यशस्वी केला आहे. बटाटा, तिळाची शेती, सूर्यफुलाची शेती असे नाविन्यपूर्ण प्रयोग करुन त्यांनी त्यात यश मिळवले आहे.
भातशेतीकरिता मनुष्यबळ अधिक लागते आणि मशागत, मशागतीसाठी लागणारा राब तसेच पेरणी, नांगरणी, लावणी, भातकापणी आणि झोडणीचा वर्षभराच्या प्रक्रियेचा विचार करता, सहा ते नऊ महिन्यात होणारे पीक घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
त्यानुसार प्रतिवर्षी यशस्वी केलेल्या वेगवेगळ्या प्रयोेगांबरोबरच यावर्षी त्यांनी हळदीचे पीक घेण्याचा निर्णय घेतला. यासाठी १०० किलोपेक्षा अधिक बियाणे बाजारातून खरेदी करुन त्यांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात हळदीच्या बियाण्याची लागवड केली आहे. ह्यसेलह्ण जातीच्या उच्चप्रतिच्या आणि सुधारीत बियाण्याचा वापर त्यांनी केला आहे.
यशवंत यांनी पॉवर हिटरच्या माध्यमातून जमिनीची नांगरट करुन, सर्व वाफे तयार केले आणि या वाफ्यांवर हळदीच्या बियाण्याची लागवड केली. शेणखत, गांडुळखताचा उपयोग त्यांनी या शेतीकरिता केला आहे. ही हळदीची लागवड त्यांनी त्यांच्या हापसूच्या बागेमध्ये झाडांच्यामधील मोकळ्या जागेत केली आहे. त्यामुळे हळदीसाठी दिलेली शेणखत, गांडुळखताची मात्रा ही हापूस झाडांकरितादेखील उपयुक्त ठरणार आहे.
यशवंत जाधव यांनी यापूर्वी राजकीय पक्षातून काम करताना गावात विविध विकासकामेदेखील केली आहेत. त्यामध्ये विशेषत्वाने पाणीटंचाईवर मात करणाऱ्या करंबेळे -कोसुंब येथील पाझर तलावाचा उल्लेख करावा लागेल. या पाझर तलावामुळे एप्रिल, मे महिन्यात आटणाऱ्या येथील विहिरींची पाण्याची पातळी वाढली आहे. किंबहुना या तलावामुळे गावातील पाणीटंचाई दूर झाली आहे. जाधव यांना गावात ह्यजेपी भाऊह्ण नावाने ओळखले जाते.
सरीवाफे दुबार पिकांसाठी
यशवंत जाधव यांचे वय जरी ७७ वर्षे असले तरीदेखील शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग करण्याची त्यांची आस आहे. जूनपूर्वी हळदीच्या उत्पादनाकरिता पॉवर टिलरच्या माध्यमातून नांगरणी करुन केलेले सरीवाफे त्यांना दुबार पीक घेण्यासाठी वापरात आणावयाचे असल्याचा मानस जाधव यांनी यावेळी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.
बटाट्याचेही उत्पादन घेणार
डिसेंबर महिन्यादरम्यान हळदीच्या पिकाचे उत्पादन घेऊन झाल्यानंतर जाधव यांना याच जागेत बटाट्याचे उत्पादन घ्यायचे आहे. म्हणजचे कमी श्रमात एकदा नांगरुन ठेवलेल्या जमिनीत ते दुसऱ्यांदा पीक घेणार आहेत. पडीक जमिनीत कोकणातील तरुणांनी अधिक आर्थिक उत्पन्न मिळवून देणारी आधुनिक शेती करावी, असे जाधव यांचे म्हणणे आहे.